• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी शहरात नियोजन बैठक उत्साहात

ByMirror

Jul 12, 2025
जिल्ह्यातील 565 क्रीडा शिक्षकांची उपस्थिती

जिल्ह्यातील 565 क्रीडा शिक्षकांची उपस्थिती


तालुका क्रीडा प्रमुखांसह क्रीडा शिक्षकांचा सन्मान

नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 आयोजन नियोजन बैठक आणि एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. शहरातील न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय येथील राजश्री शाहू सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्ह्यातील 565 क्रीडा शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली. प्रथमच अहिल्यानगर महानगरपालिका व 14 तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांची एकत्रित बैठक घेण्यात आली होती.


राष्ट्रगीत व दीपप्रज्वलनाने या बैठकीचे प्रारंभ झाले. यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, संस्थेचे सहसचिव जयंत वाघ, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. सुनील जाधव, मनीषा पुंडे, अंजली देवकर, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, प्राचार्य विजयकुमार पोकळे, क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, जिल्हाध्यक्ष नंदकुमार शितोळे, प्रा. संजय साठे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढवळे, विशाल गर्जे, संतोष वाबळे, महेंद्र हिंगे, बापूराव होळकर, घनश्‍याम सानप, दिलीप काटे, सुधाकर सुंभे, संदेश भागवत, आकाश नढे यांच्यासह 14 तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित होते.


प्रारंभी क्रिकेट, बॉक्सिंग आदी खेळ संघटनांचे अध्यक्ष व क्रीडा क्षेत्राला पाठबळ देणारे माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांना बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रेसिडेन्शियल हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होत असतो. याकरिता प्रत्येक शाळेने जास्तीत जास्त खेळाडूंना शालेय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित द्यावे. सर्व शाळांनी क्रीडा स्पर्धामध्ये आपला सहभाग नोंदविण्याचे त्यांनी आवाहन केले.


प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दरवर्षी जिल्हा परिषद मधील जास्तीत जास्त शाळा शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी व्हाव्या, यासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांना सूचना केल्या आहेत. प्रथमच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धेमध्ये सहभागी करण्याकरिता शिक्षण विभाग व क्रीडा विभाग यांची एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


याप्रसंगी सन 2024-25 मधील शालेय क्रीडा स्पर्धाचे तालुका स्तरावर यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्व तालुक्यांचे तालुका क्रीडा प्रमुख व जिल्ह्यातील पर्यवेक्षक व मुख्याध्यापक पदावर पदोन्नती झालेल्या क्रीडा शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी क्रीडा शिक्षकांचा देखील सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


दुपारच्या सत्रात शालेय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागाकरिता वेबसाईटद्वारे शाळा रजिस्ट्रेशन करणे व प्राथमिक प्रवेशिका भरणे याचे प्रशिक्षण क्लिक स्पोर्ट्सचे संचालक प्रवीण बानवलीकर यांनी दिले. जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे यांनी 2025-26 मध्ये आयोजित करावयाचे 93 खेळ प्रकारांबद्दल माहिती दिली. तसेच तालुकास्तरावरील 10 खेळ प्रकारांचे आयोजन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. मिशन लक्ष्यवेध अंतर्गत राज्यातील खाजगी अकादमीचे सक्षमीकरण करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजनेची सविस्तर माहिती दिली. तसेच क्रीडा विभागाचे विविध उपक्रम, अनुदान योजनेबाबत मार्गदर्शन केले.


याप्रसंगी विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या क्रीडा शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला. क्रीडा शिक्षकांनी तंदुरुस्त राहून जास्तीत जास्त खेळाडू निर्माण करावेत, याकरिता त्यांनी स्वतःचे आरोग्य देखील जपावे याकरिता सर्वांची आरोग्य तपासणी करण्याचा नवीन उपक्रम यावर्षी प्रथमच जिल्ह्यात राबविण्यात आला. सकाळी सुरु झालेली बैठक संध्याकाळी पर्यंत रंगली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गावडे यांनी केले. आभार भाऊराव वीर यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *