• Thu. Sep 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलची मुंबईत बैठक

ByMirror

Sep 9, 2026
अहिल्यानगर पदाधिकाऱ्यांचा सहभाग

ओबीसी संघटन बळकट करण्यावर चर्चा


अहिल्यानगर पदाधिकाऱ्यांचा सहभाग


महात्मा फुले दाम्पत्याच्या अर्धाकृती पुतळ्याने प्रदेशाध्यक्षांचा सन्मान


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलची महत्त्वपूर्ण बैठक मुंबई येथे उत्साहात पार पडली. अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत ओबीसी सेलच्या संघटनात्मक वाटचालीसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी ओबीसी समाजाशी संबंधित विविध प्रश्न, पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रम तसेच ओबीसी सेलची प्रभावीपणे बांधणी करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीस अहिल्यानगर ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक खेडकर, शहर जिल्हा कार्याध्यक्ष नितीन घोडके, शहर जिल्हा उपाध्यक्ष किरण जावळे, महेश सुडके आदी पदाधिकारी उपस्थित होते. अहिल्यानगर शहरातील ओबीसी सेलच्या संघटनात्मक कामकाजाचा तसेच आगामी काळातील उपक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात आला.


दरम्यान, अहिल्यानगर ओबीसी सेलच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांचा क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याची भेट देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर शहरातील ओबीसी सेलच्या पुढील वाटचालीसंदर्भात प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच ओबीसी समाजातील नागरिकांशी अधिक प्रभावीपणे संपर्क वाढविणे, संघटनेत नवीन कार्यकर्त्यांना संधी देणे आणि पक्षसंघटना अधिक सक्षम करण्याबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.


ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करत पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *