अहिल्यानगरात मातंग समाजाच्या वतीने निषेध; मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय चौकशी, पोलीस संरक्षण व आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
संविधानाची पायमल्ली करत समाजातील नेतृत्वावर भ्याड हल्ले सहन केले जाणार नाही -सुनिल शिंदे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी राज्यभर जनजागृती करणारे लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा अहिल्यानगर शहरातील मातंग समाजाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून आरोपींना तातडीने अटक करावी, हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घ्यावा तसेच कैलास खंदारे यांना शासकीय पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर सुनिल शिंदे, जयवंत गायकवाड, लक्ष्मण नीक्षे, ज्ञानेश्वर जगधने, प्रवीण वैरागर, सिताराम शिरसाठ, किरण कंगरे, लखन साळवे, संतोष उमाप, राजाराम काळे, उत्तम रोकडे, नवनाथ शिंदे, अभी मिसाळ, विशाल साळवे आणि तेजस अवचर यांच्यासह मातंग समाजातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 26 जून रोजी पहाटे राहुरी येथे आयोजित अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण परिषदेला उपस्थित राहण्यासाठी कैलास खंदारे हे चिखली येथील त्यांच्या निवासस्थानावरून बसस्थानकाकडे पायी जात होते. त्यावेळी जाफराबादचिखली रोडवरील बुद्धविहार परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर दांडक्याने अचानक हल्ला केला. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेत खंदारे यांना गंभीर दुखापत टळली असली, तरी सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्कांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याची भावना समाजबांधवांनी व्यक्त केली आहे.
या घटनेचा निषेध व्यक्त करताना सुनिल शिंदे यांनी सांगितले की, कोणत्याही वैचारिक मतभेदांचे निराकरण लोकशाही मार्गाने आणि वैचारिक पातळीवरच व्हायला हवे. मात्र कायदा हातात घेऊन संविधानाची पायमल्ली करत समाजातील नेतृत्वावर भ्याड हल्ले करणे कदापि सहन केले जाणार नाही. अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळ परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त करून आरोपींचा तातडीने शोध घ्यावा, हल्ल्यामागील सूत्रधारांचा पर्दाफाश करावा आणि कैलास खंदारे यांना तात्काळ शासकीय पोलीस सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
सामाजिक न्यायासाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या नेतृत्वावर झालेल्या या हल्ल्यामुळे विविध सामाजिक संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. राज्य सरकारने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
