• Tue. Sep 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

कारागृह केवळ दंडालय नको; ‘धारणालय पुनर्बांधणी विद्यापीठ’ झाले पाहिजे!

ByMirror

Sep 15, 2026
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुनर्वसनाचा अभिनव प्रस्ताव

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुनर्वसनाचा अभिनव प्रस्ताव


जन्मठेपेतील कैद्यांसाठी शासनमान्य ‘धारणालय परिवर्तन पदवी’ सुरू करण्याची मागणी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना केवळ कारावासाची शिक्षा देण्याबरोबरच त्यांच्या पुनर्वसनासाठी शिक्षण, विचारपरिवर्तन आणि वर्तनातील सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देणारी व्यवस्था निर्माण करावी. कारागृह हे केवळ दंड देण्याचे ठिकाण न राहता ‘धारणालय पुनर्बांधणी विद्यापीठ’ झाले पाहिजे, अशी मागणी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आली आहे.


पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी जन्मठेपेतील कैद्यांसाठी शासनमान्य ‘धारणालय परिवर्तन पदवी शिक्षण’ सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या माध्यमातून कैद्यांच्या पुनर्वसनाला शिक्षण, मानसशास्त्रीय मदत, कौशल्यविकास आणि सामाजिक जबाबदारीची जोड देण्याची भूमिका त्यांनी मांडली.


ॲड. गवळी यांच्या मते, गुन्हेगारी वर्तनामागे व्यक्तीचे अनुभव, मूल्यव्यवस्था, भावनिक प्रतिक्रिया आणि वर्तनाचे दीर्घकालीन नमुने कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे केवळ शरीराला कारागृहात ठेवणे पुरेसे नसून, व्यक्तीच्या विचार आणि वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी पुनर्वसनात्मक शिक्षणाची संधी देणे आवश्‍यक आहे. प्रस्तावित ‘धारणालय परिवर्तन पदवी’ अभ्यासक्रमात संविधानिक नैतिकता, समता, बंधुता, अहिंसा, वैज्ञानिक दृष्टिकोन, भावनांचे नियमन, पीडितांच्या वेदनांची जाणीव, संघर्ष निवारण, व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य, श्रमप्रतिष्ठा, कौशल्यविकास आणि समाजोपयोगी सेवा या विषयांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.


या अभ्यासक्रमाचे मूल्यमापन केवळ पुस्तकी परीक्षेवर आधारित नसावे, अशीही भूमिका मांडण्यात आली आहे. कैद्याच्या वर्तनातील सातत्यपूर्ण सुधारणा, आपल्या कृत्याची जबाबदारी स्वीकारण्याची क्षमता, सहानुभूती, अहिंसक संवाद, भावनिक नियंत्रण आणि विधायक उपक्रमांमधील सहभाग यांचा पुनर्वसन प्रक्रियेत विचार केला जावा, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.


मानसोपचार, व्यसनमुक्ती किंवा आघाताशी संबंधित तज्ज्ञ मदतीची आवश्‍यकता असलेल्या कैद्यांना आवश्‍यकतेनुसार मानसोपचारतज्ज्ञ व इतर तज्ज्ञांची मदत उपलब्ध करून देण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली आहे. हा उपक्रम कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय विचारसरणीचे सक्तीचे आरोपण करणारा नसावा. प्रत्येक कैद्याला शिक्षणाची समान संधी मिळावी आणि त्याचवेळी त्याच्या विचारस्वातंत्र्य व मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण झाले पाहिजे, अशी भूमिका प्रस्तावात मांडण्यात आली आहे.


प्रस्तावानुसार, शिक्षण आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून कैद्यांना राग, हिंसा, सूड, द्वेष यांसारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळविणे, परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणे आणि कायदा व संविधानिक मूल्यांच्या चौकटीत वर्तन करण्याची सवय विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाऊ शकते. दरम्यान, ‘धारणालय परिवर्तन पदवी’ मिळाल्याने जन्मठेपेची शिक्षा आपोआप संपणार नाही किंवा न्यायालयीन प्रक्रिया अथवा परोल व्यवस्थेला त्याचा पर्याय निर्माण होणार नाही, हेही प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे. या शिक्षणाचा उद्देश कैद्यांच्या पुनर्वसनाचे वर्तनाधारित मूल्यमापन करण्यासाठी एक अतिरिक्त संधी निर्माण करणे हा आहे.


“जन्मठेप म्हणजे जीवनाची समाप्ती नव्हे; ती परिवर्तनाची दीर्घ संधी ठरू शकते. कारागृहाच्या भिंती शरीराला थांबवू शकतात; मात्र ज्ञान, विवेक आणि संवेदनशील शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणता येऊ शकतो,” अशी भूमिका ॲड. कारभारी गवळी यांनी मांडली आहे. “कारागृह केवळ दंडालय नकोते धारणालय पुनर्बांधणी विद्यापीठ झाले पाहिजे,” अशी मागणी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, राहुल आढाव, बाळासाहेब पालवे, आनंद आढाव, अशोक भोसले, पोपट भोसले, वीर बहादुर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, अभिमान शिंदे, बाबासाहेब भोसले, अमित थोरात आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *