श्रीरामपूरच्या साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे कवी संमेलनात झाला गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आधार सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपचे शहर जिल्हा सचिव संदीप पवार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य व लक्ष्मी माता मंदिर ट्रस्ट, वडाळा महादेव यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्रीरामपूर येथील लोकमान्य टिळक वाचनालय, बेलापूर रोड येथे एक दिवसीय साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या साहित्यिक व सामाजिक उपक्रमात मान्यवरांच्या हस्ते संदीप पवार यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबादास सागट होते.
उद्घाटक म्हणून डी.के. मंडलिक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये, करण नवले, सायमन भास्कर, प्रकाश कुलथे, गायत्री म्हस्के, विजय शेलार, सुभाष त्रिभुवन, डॉ. संजय दुशिंग, भागचंद नवगिरे, संजय वैरागर, पोपटराव पठारे आदी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष अनिरुद्ध महाले होते. यावेळी साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव बाळासाहेब पवार, लक्ष्मी माता मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोंडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संदीप पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून अहिल्यानगर शहरात सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘आधार सामाजिक संस्था’च्या माध्यमातून गरजू, वंचित, दुर्बल व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या घटकांना मदतीचा हात देण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. समाजातील विविध प्रश्नांवर पुढाकार घेत संबंधित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू असतात.
सामाजिक कार्याबरोबरच पवार हे राजकीय क्षेत्रातही सक्रिय असून, आपल्या राजकीय पदाचा उपयोग समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी करण्यावर त्यांचा भर आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व सुविधांचा लाभ गरजू नागरिकांना मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. वंचित घटकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याचे कामही ते करत आहेत.
सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या मदतीसाठी केलेल्या या कार्याची दखल घेऊन लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य व लक्ष्मी माता मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांना समाज भूषण पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल संदीप पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

