• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

बेकायदेशीर सावकारीतून गोरगरीबांच्या जमीन बळकाविणाऱ्या सावकाराविरोधात रिपार्इचा एल्गार

ByMirror

Jul 17, 2026
शेंडी पोखर्डी येथील त्या सावकारावर ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल करण्याची मागणी; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

शेंडी पोखर्डी येथील त्या सावकारावर ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल करण्याची मागणी; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन


व्याजाच्या व्यवहारातून शेतजमीन हडप केल्याचा गंभीर आरोप; उमाप कुटुंबाला न्याय द्या, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बेकायदेशीर सावकारीच्या माध्यमातून मातंग समाजातील एका गरीब कुटुंबाची शेतजमीन फसवणूक करून बळकावल्याचा गंभीर आरोप करत शेंडी पोखर्डी येथील त्या सावकारावर महाराष्ट्र सावकारी अधिनियम तसेच अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा (ॲट्रॉसिटी ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)च्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी रिपार्इचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, गुलामअली शेख, विजय शिरसाठ, सुनील वाघमोडे, नामदेव उमाप, ताराबाई वाघमारे, वसंत उमाप, उत्तम उमाप, विजय पाटोळे, अरबाज शेख यांच्यासह पीडित उमाप कुटुंबीय उपस्थित होते.


निवेदनानुसार, सन 2016 मध्ये मौजे कोळपे आखाडा, नांदगाव येथील नामदेव मनोहर उमाप, उत्तम मनोहर उमाप, वसंत मनोहर उमाप आणि ताराबाई बबन वाघमारे यांच्या कुटुंबाची गट क्रमांक 11/1 मधील 1 हेक्टर 14 आर शेतजमीन आर्थिक अडचणीमुळे शेंडी पोखर्डी येथील सावकाराकडे 3 टक्के व्याजदराने गहाण ठेवण्यात आली होती. या व्यवहारात कुटुंबाने तीन लाख रुपये घेतल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


पीडित कुटुंबाचा आरोप आहे की, सावकाराने गहाणखत करण्याऐवजी त्यांना नगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नेऊन खरेदीखतावर स्वाक्षऱ्या करून घेतल्या. मात्र, त्यावेळी पैसे व्याजासह परत केल्यानंतर जमीन पुन्हा नावावर करून देण्याचे आश्‍वासन दिल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या व्यवहारावेळी गावातील दोन व्यक्ती साक्षीदार असल्याचा दावा करण्यात आला असून, त्यांच्या स्वाक्षऱ्याही संबंधित दस्तऐवजावर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
उमाप कुटुंबाने 2020-21 दरम्यान व्याजासह संपूर्ण रक्कम परत करण्यासाठी संबंधित सावकाराशी संपर्क साधला होता. मात्र, त्यावेळी त्यांना पैसे स्वीकारण्याऐवजी शिवीगाळ करण्यात आली, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरून हाकलून दिल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.


त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा जमीन परत मिळावी आणि ठरलेली रक्कम स्वीकारावी, अशी विनंती करण्यासाठी उमाप कुटुंब सावकाराकडे गेले. त्यावेळी “पाहू, मी कळवतो,” असे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर 8 एप्रिल 2026 रोजी संबंधित जमीन तृतीय पक्षाला विकल्याचे उमाप कुटुंबाच्या निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे.
जमीन विक्रीची माहिती मिळाल्यानंतर उमाप कुटुंबाने नवीन खरेदीदारांकडे जाऊन जमीन परत मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यासाठी 48 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. गरीब कुटुंबाला एवढी मोठी रक्कम उभी करणे शक्य नसल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा रिपाइने केला आहे.


या प्रकरणात व्याजाच्या व्यवहाराचा उल्लेख असलेले कॉल रेकॉर्डिंग उमाप कुटुंबाकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच संबंधित सावकाराने सावकारीच्या माध्यमातून अनेक गरीब कुटुंबांच्या जमिनी बळकावून मोठी मालमत्ता जमा केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला असून, त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उमाप कुटुंब हे मातंग समाजातील अनुसूचित जातीचे असल्याने त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत शेतजमीन बळकावण्यात आल्याचा आरोप रिपाइने केला आहे. त्यामुळे संबंधित सावकारावर बेकायदेशीर सावकारी, फसवणूक, तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *