भटक्या-विमुक्त समाजाने एकजुटीने पुढे येऊन सामाजिक परिवर्तन घडवावे -राजाभाऊ वाडेकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भटक्या-विमुक्त चळवळीचे प्रणेते आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कॉम्रेड दौलतराव मारुती भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अहिल्यानगर शहर जिल्हा भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या वतीने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
या अभिवादन सोहळ्यासाठी भटक्या विमुक्त समाज संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ वाडेकर, विनोद काळे, सुरज चव्हाण, अनिल भिंगारे, नितीन गंगेकर, निलेश चव्हाण, रितिक उघडे, कृष्णा उघडे, लक्ष्मणराव कोलकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजाभाऊ वाडेकर म्हणाले की, “कॉम्रेड दौलतराव मारुती भोसले यांनी भटक्या-विमुक्त समाजाला केवळ संघटित करण्याचे काम केले नाही, तर शिक्षण, सामाजिक न्याय, स्वाभिमान आणि संविधानिक हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणाही दिली. समाजातील उपेक्षित, वंचित आणि दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेतले. त्यांचे कार्य आजही प्रत्येक समाजकार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आहे.”
ते पुढे म्हणाले, आजही भटक्या-विमुक्त समाजासमोर शिक्षण, रोजगार, निवारा, आरोग्य आणि सामाजिक न्यायाशी संबंधित अनेक प्रश्न कायम आहेत. या प्रश्नांवर प्रभावीपणे मात करण्यासाठी समाजात एकजूट निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. कॉम्रेड भोसले यांनी दाखविलेल्या विचारांच्या आणि संघर्षाच्या मार्गावर चालत समाजातील तरुणांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, संविधानिक मूल्यांचा स्वीकार करावा आणि समाजहितासाठी संघटितपणे कार्य करावे. समाजाचा सर्वांगीण विकास हा संघटन, शिक्षण आणि संघर्ष या त्रिसूत्रीवरच शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

