बुरुडगावात रंगला रिंगण सोहळा; दिंडी ठरली आदर्श वारीचा मानबिंदू
चांदीच्या पादुका अर्पण, महिलांना साड्यांचे वाटप आणि फुगड्यांनी रंगला भक्तीचा सोहळा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बुरूडगाव येथील पावन हनुमान मंदिर श्री क्षेत्र बुरूडगाव पायी दिंडीचे आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. गावातील प्रत्येक रस्ता विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. “ज्ञानोबा-तुकोबा”, “माऊली… माऊली…” या जयघोषात टाळ-मृदंगाचा निनाद, वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तीचा अविस्मरणीय संगम अनुभवायला मिळाला. पालखीभोवती दौडणाऱ्या अश्वाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले, तर वैष्णवांच्या मेळ्याने संपूर्ण बुरूडगाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.
वारकऱ्यांना सर्वाधिक सुविधा उपलब्ध करून देणारी आणि शिस्तबद्ध नियोजनासाठी ओळखली जाणारी बुरूडगाव पायी दिंडी यंदाही विशेष आकर्षण ठरली. दिंडी सोहळ्याच्या प्रस्थानप्रसंगी उद्योजक नरेंद्र फिरोदिया, गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड. सचिन जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, रोहन खंडागळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शरद क्यादर , विशालशेठ पवार, उद्योजक संकेतभाऊ कुलट, सुभाष कुलट आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिंडीचे प्रमुख संयोजक डॉ. संतोष यादव यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी समस्त बुरूडगाव ग्रामस्थ, नियोजन समितीचे, किशोर कुलट, जालिंदर कुलट, अक्षय लगड, नवनाथ वाघ, जालिंदर वाघ, बापू औताडे, अशोक जाधव, अविनाश जाधव, बाळासाहेब रकटे, दिगंबर कार्डिले, भाऊसाहेब कुलट, बाळसाहेब जाधव, नवनाथ मोकाटे, फारुख शेख, विष्णुदास जाधव, पांडू जाधव, राधाकिसन कुलट, शिवाजी मोढवे, बाळासाहेब मोढवे, गोवर्धन कामीनसे, जनजीवन माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक-विद्यार्थी, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक तसेच बुरूडगाव आजी-माजी सैनिक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच यादव परिवाराच्या वतीने दिंडीसाठी चांदीच्या पादुकांची भेट देण्यात आली. या पादुकांचे पूजन करून भक्तिभावाने पालखीत विराजमान करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी बुरूडगाव दिंडीच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “वारकऱ्यांना आरोग्य, सुरक्षा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणारी ही दिंडी इतर दिंडींसाठी आदर्शवत आहे. विशेषतः प्रत्येक वारकऱ्याचा विमा काढण्याचा अभिनव उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून, इतर दिंडींनीही या उपक्रमाचा आदर्श घ्यावा. विठ्ठलभक्तीबरोबरच वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारणारे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.” त्यांनी सर्व वारकऱ्यांना सुखरूप व मंगलमय वारीच्या शुभेच्छाही दिल्या.
दिंडी प्रस्थानापूर्वी पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपूर्ण गावातून भव्य प्रदक्षिणा काढण्यात आली. महिलांनी पारंपरिक फुगड्या खेळत भक्तिरसाचा आनंद लुटला. गावातील प्रत्येक घरासमोर महिलांनी सडा-रांगोळी काढून दिंडीचे स्वागत केले. दिंडीच्या अग्रभागी भगवे ध्वज हातात घेऊन लेझीम सादर करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी वातावरणात उत्साह निर्माण केला. विठ्ठल-रुक्मिणी तसेच विविध संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. वारकरी वेशातील चिमुकल्यांनी सादर केलेला रिंगण सोहळा उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.
वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन चालणारे झेंडेकरी, टाळकरी, भजनी मंडळे, फुलांनी सजवलेला रथ, डोक्यावर तुळस आणि कळस घेतलेल्या महिला तसेच हजारो विठ्ठलभक्तांच्या सहभागामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. महिला पोलीस कर्मचाऱ्यांनीही वारकरी महिलांसोबत फुगड्यांचा फेर धरत वारीतील भक्ती आणि सामाजिक समरसतेचा सुंदर संदेश दिला.
यंदा बुरूडगाव पायी दिंडीचे नववे वर्ष असून, सुमारे पाचशेहून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. ह.भ.प. लक्ष्मण महाराज शास्त्री आणि ह.भ.प. योगेश महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच ह. भ. प. राहुल दरंदले महाराज, ह.भ.प. दीपक महाराज भवर, ह.भ.प. रामभाऊ वाघ आणि ह.भ.प. कार्तिक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
दरम्यान, उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या वतीने वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिका, निवासी डॉक्टर तसेच आवश्यक औषधांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांना सुरक्षित, निरोगी आणि सुखकर वारीचा अनुभव मिळावा यासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

