वारकऱ्यांच्या हस्ते गावात वृक्षारोपण
गावात ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष व टाळ मृदंगाचा गजरात दिंडी मार्गस्थ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात श्री क्षेत्र पंढरपूरकडे नुकतेच प्रस्थान झाले. गावात भक्तीमय वातावरणात डोळे दिपवून टाकणारा रिंगण सोहळा पार पडला. या दिंडीत कल्याणच्या भाविकांसह गावाच्या पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दिंडीतील भव्य रथाचे गावात जागोजागी स्वागत करुन भाविकांनी पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दिंडीचे हे 23 वे वर्ष आहे.
गावात स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने वीणेकरी ह.भ.प. राम (प्रशांत) महाराज जाधव, ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर, कल्याणचे ह.भ.प. धुंडा महाराज म्हसकर, पायी दिंडी सोहळा ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ डोंगरे व लक्ष्मण चौरे यांचा संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी सत्कार केला. प्रारंभी डोंगरे यांच्या हस्ते रथाचे पूजन करुन दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाले. वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये श्री संत सावता महाराजांच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी माजी सरपंच साहेबराव बोडखे, सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, दुध डेअरीचे चेअरमन गोकुळ जाधव, अनिल डोंगरे, गोरख फलके, भागचंद जाधव, सागर कापसे, मच्छिंद्र डोंगरे, डॉ. विजय जाधव, भाऊसाहेब कापसे, पिंटू जाधव, अरुण फलके, गुलाब जाधव, भरत बोडखे, संजय कापसे, जयराम जाधव, दत्तू फलके, कुमार फलके, संदिप डोंगरे, सुभाष कदम, बबन केदार, बाळू बोडखे आदींसह ग्रामस्थ, महिला वर्ग व भजनी मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिंडी प्रस्थान कार्यक्रमात निमगाव वाघा आरोग्य केंद्राचे किशोर काळे व भरत बोडखे यांनी वारकऱ्यांसाठी प्राथमिक औषधोपचारासाठी औषधी किटची भेट दिली. साहेबराव बोडखे मित्र मंडळाच्या वतीने वारकऱ्यांना रेनकोट भेट देण्यात आले. उद्योजक राजेंद्र शिंदे यांचे दिंडीसाठी विशेष सहकार्य मिळाले. दिंडीमध्ये सुमारे अडीचशे महिला, पुरुष भाविक सहभागी झाले आहेत. दिंडीच्या अग्रभागी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करणारे झेंडेकरी, पांढऱ्या पोशाखात सहभागी भाविक, भजनी मंडळी, फुलांनी सजवलेले रथ व डोक्यावर तुळशी, कळस घेतलेल्या महिला वारीसाठी निघाल्या आहेत. श्री नवनाथ पायी दिंडी केडगाव, अरणगाव, वाळकी, रुईछत्तीसी मार्गे पंढरपुरला जाणार आहे. दिंडीत दररोज हरिपाठ, भारुड, किर्तन व प्रवचनांच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

