• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

नाना डोंगरे यांना डॉ. जाकीर हुसैन महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर

ByMirror

Oct 4, 2023

आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जळगाव जिल्ह्यात पुरस्काराने होणार गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या (जि. जळगाव) वतीने सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष फारुख शाह नौमानी यांनी डोंगरे यांच्या पुरस्काराची घोषणा केली.


आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात मागील पंधरा वर्षापासून सामाजिक कार्य सुरु आहे. दरवर्षी संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य व निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी डोंगरे यांना संस्थेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे शाळेत कार्यरत असून, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात वृक्षरोपण, बीजरोपण व वृक्षसंवर्धनासाठी विविध कार्यक्रम घेऊन त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मोठी जनजागृती केली आहे. डोंगरे यांनी जिल्हा पातळीवर स्त्री जन्माचे स्वागत, वृक्षरोपण, स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, मतदार जागृती, जलसंधारण जागृती मोहिम व रक्तदान शिबीर व्यापक स्वरुपात राबविले. व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवून युवकांना दिशा देण्याचे कार्य सुरु आहे.

विविध स्पर्धा, महिला बचत गट मेळावे, काव्य व युवा संमेलन घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य ते करत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. जळगाव जिल्ह्यात मान्यवरांच्या हस्ते 19 नोव्हेंबर रोजी त्यांना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डोंगरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *