निमगाव वाघातील नवनाथ विद्यालयात डोंगरे यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान
वृक्षभेटीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात निस्वार्थपणे योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना नाशिक येथे चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त प्रदान करण्यात आलेल्या ‘सन्मान कलावंतांचा’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना वृक्ष भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत शिक्षकांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक उत्तम कांडेकर आणि ज्येष्ठ शिक्षिका मंदा साळवे यांच्या हस्ते पै. नाना डोंगरे यांचा वृक्ष देऊन सन्मान केला. यावेळी कचरू कापसे, आप्पासाहेब कदम, शरद भोस, स्वाती इथापे, सुप्रिया ठुबे, तेजस केदारी, रत्नमाला थोरात, मोहिनी धर्माधिकारी, पल्लवी खरात, दिपाली शिरसाठ, दिपाली ठाणगे, निकिता शिंदे, रेखा जरे, तुकाराम पवार, प्रमोद थिटे, राम जाधव, बाळासाहेब कोतकर, आनंद ग्यानाप्पा, लहानू जाधव आदी शिक्षक उपस्थित होते.
कलावंत विचार मंच, नाशिक आणि कमल फिल्म प्रोडक्शन, कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात पै. नाना डोंगरे यांना नुकताच ‘सन्मान कलावंतांचा’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला आहे.
यावेळी मुख्याध्यापक उत्तम कांडेकर म्हणाले की, नवनाथ विद्यालयात कार्यरत असतानाच पै. नाना डोंगरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत निस्वार्थपणे योगदान दिले आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, साहित्यिक आणि धार्मिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य उभे केले आहे. त्यांच्या कार्यामुळे गावातील नवोदित युवकांना प्रेरणा मिळत असून ग्रामीण भागातील युवक आणि महिलांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे.
ग्रामीण भागात साहित्यिक चळवळ रुजविण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नांतून आठ राज्यस्तरीय काव्य संमेलने आणि सहा ग्रामीण मराठी साहित्य संमेलने यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आली आहेत. साहित्य, कला आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रतिभावंतांना प्रोत्साहन देण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे कांडेकर यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना पै. नाना डोंगरे यांनी विद्यालयातील शिक्षकांनी केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सामाजिक कार्य करताना समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, नवोदितांना संधी उपलब्ध करून देणे आणि साहित्य-संस्कृतीची चळवळ ग्रामीण भागात अधिक व्यापक करणे, हेच आपले ध्येय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या पुरस्काराबद्दल नवनाथ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे आणि सचिव सुमन कुरेल यांनीही पै. नाना डोंगरे यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

