लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या पदग्रहण सोहळ्यात सेवाभावाचा संकल्प
लायन्सच्या अध्यक्षपदाची हरजितसिंग वधवा यांनी तर लिअोच्या अध्यक्षपदाची हर्षवर्धन किथानी यांनी स्विकारली सूत्रे
तुर्कस्तान, बेल्जियम, डेन्मार्क व हंगेरीतील युवा प्रतिनिधींची विशेष उपस्थिती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील गरजू, वंचित आणि संकटग्रस्त घटकांना आधार देण्याचे कार्य लायन्स क्लब सातत्याने करत असून, कोणतेही संकट आले तरी लायन्स व लिओ क्लब ऑफ अहमदनगरने आपल्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती दिली आहे. कोरोनाकाळात सुरू करण्यात आलेली लंगर सेवा आजही अविरत सुरू असून, या उपक्रमाने देशासह परदेशातील लायन्स संघटनांचेही लक्ष वेधून घेतले आहे. त्याचबरोबर लिओ क्लबच्या माध्यमातून युवक-युवती मोठ्या संख्येने सामाजिक चळवळीशी जोडले जात असल्याचे प्रतिपादन पदग्रहण अधिकारी प्रविण गुलाटी यांनी केले.
अहिल्यानगर शहरातील लायन्स क्लब ऑफ अहमदनगर आणि लिओ क्लब ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पदग्रहण सोहळा नगर-संभाजीनगर मार्गावरील महाराजा हॉटेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास रिजन चेअरमन संदीप गोंदकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी लायन्सचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सोहळ्यात लायन्स क्लबच्या अध्यक्षपदाची धुरा हरजितसिंग वधवा यांनी स्वीकारली. सचिवपदी हरिष हरवानी तर खजिनदारपदी विजय कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारला. मावळते अध्यक्ष डॉ. संजय असनानी, सचिव प्रशांत मुनोत आणि खजिनदार दिलीप कुलकर्णी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे पदभार सोपविला. तसेच लिओ क्लब ऑफ अहमदनगरच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन किथानी, सचिवपदी रित जाजू यांनी पदभार स्वीकारला. मावळते अध्यक्ष गुरनूरसिंग वधवा आणि खजिनदार जपज्योत बग्गा यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी लायन्स इंटरनॅशनलच्या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित इंटरनॅशनल यूथ एक्स्चेंज प्रोग्राम अंतर्गत शहरात आलेले तुर्कस्तान (इस्तंबूल) येथील अभिनेत्री डेफ्ने एर्सेन (Defne Ersen), बेल्जियमची ईव्हा-लुना बेलॉय (Eva-Luna Beloy), डेन्मार्कचा एलियट केलर लॉरिट्झेन (Elliot Keller Lauritzen) आणि हंगेरीचा फाबोक मॅत्यास (Fabok Matyas) हे चार युवा प्रतिनिधी तसेच नॉर्वे येथे यूथ एक्स्चेंजसाठी गेलेले अहिल्यानगरचे जिनेश छाजेड यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदनाने झाली. प्रणिता भंडारी यांनी ध्वजवंदन घेतले. अरविंद पारगावकर यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला, तर सुमित लोढा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पदग्रहण अधिकारी प्रविण गुलाटी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ देत त्यांच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली. तसेच नव्याने लायन्स परिवारात दाखल झालेल्या सदस्यांना लायन्सच्या सेवाभावी परंपरेची, कार्यपद्धतीची आणि ‘लायनिझम’ची सविस्तर माहिती दिली.
नूतन अध्यक्ष हरजितसिंग वधवा यांनी आपल्या मनोगतात लायन्स क्लबच्या आगामी वर्षातील उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले की, कोरोनाकाळात सुरू झालेली लंगर सेवा आजही निरंतर सुरू असून, गरजूंना मोफत अन्न उपलब्ध करून देण्याचे हे कार्य अधिक व्यापक केले जाणार आहे. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, वंचित नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, जनजागृती अभियान आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
लिओ क्लबचे नूतन अध्यक्ष हर्षवर्धन किथानी यांनी युवक-युवतींना समाजसेवेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार व्यक्त केला. तरुणांच्या ऊर्जेला सकारात्मक दिशा देत रक्तदान, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण आणि सामाजिक जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.
मावळते अध्यक्ष डॉ. संजय असनानी आणि लिओ क्लबचे मावळते अध्यक्ष गुरनूरसिंग वधवा यांनी मागील वर्षभरात राबविण्यात आलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि सेवाभावी उपक्रमांचा सविस्तर अहवाल सादर करून सदस्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सिमरनकौर वधवा यांनी केले, तर धनंजय भंडारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी सीए शंकर अंदानी, संदेश कटारिया, सुनिल छाजेड, डॉ. अनघा पारगावकर, किरण भंडारी, डॉ. मानसी असनानी, सतीश बजाज, डॉ. प्रिया मुनोत आदी सदस्य उपस्थित होते.

