• Wed. Aug 5th, 2026

Mirrornews24

Marathi News

युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश गलांडे यांच्या हल्या प्रकरणी आरोपी चिरंजीव गाढवे याचा जामीन रद्द

ByMirror

Aug 4, 2026
जामिनाच्या अटींचा भंग महागात; 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस स्टेशनला सरेंडर होण्याचा आदेश

जामिनाच्या अटींचा भंग महागात; 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस स्टेशनला सरेंडर होण्याचा आदेश


बनावट हल्ल्याच्या कटाचाही फटका; पाइपलाइन रोड गोळीबार प्रकरणातही गाढवे फरार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी चिरंजीव गाढवे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने रद्द केला असून, त्यांना दि. 6 ऑगस्ट 2026 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शरण येण्याचे आदेश दिले आहेत. जामीन मंजूर करताना घालण्यात आलेल्या अटींचा भंग केल्याबरोबरच जामिनाचा गैरवापर केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 27 डिसेंबर 2025 रोजी एमआयडीसी परिसरात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात मुख्य आरोपी चिरंजीव गाढवे याने बंदुकीचा वापर केल्याचा, तर इतर आरोपींनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेप्रकरणी योगेश गलांडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 958/2025 दाखल केला होता.


या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी चिरंजीव गाढवे यांनी जिल्हा न्यायालयात क्रिमिनल अँटिसिपेटरी बेल अर्ज क्रमांक 64/2026 दाखल केला होता. न्यायालयाने दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांना अटींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला. जामिनाच्या आदेशात आरोपीने दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक रविवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजेरी लावणे, तसेच भविष्यात अशा प्रकारचा कोणताही गुन्हा न करणे, अशा स्पष्ट अटी घालण्यात आल्या होत्या.
मात्र, आरोपीने न्यायालयाच्या आदेशातील अटींचे पालन केले नसल्याचे तपासादरम्यान समोर आले. नियमित हजेरी न लावल्याने तपासी अधिकाऱ्यांनी सरकारी वकिलांमार्फत क्रिमिनल एम.ए. क्रमांक 58/2026 अन्वये जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. दरम्यानच्या काळात चिरंजीव गाढवे यांनी स्वतःवर हल्ला झाल्याची फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 401/2026 अंतर्गत दाखल केली होती. या फिर्यादीत गौरव पाटोळे व योगेश गलांडे यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी माणसे पाठविल्याचा आरोप करण्यात आला होता.


मात्र, या प्रकरणाचा पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक आणि सखोल तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली. तपासात चिरंजीव गाढवे यांनीच स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधित गुन्ह्यात फिर्यादी असलेले चिरंजीव गाढवे यांनाच आरोपी करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात संबंधित कलमांची भर घालण्यात आली.


जामीन रद्द करण्याच्या अर्जावर दि. 3 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा न्यायालय क्रमांक 6 समोर सविस्तर युक्तिवाद झाला. सरकार पक्षाने आरोपीने जामिनाच्या अटींचा भंग केला असून, जामिनाचा स्पष्टपणे गैरवापर केल्यामुळे त्याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा, अशी भूमिका मांडली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत चिरंजीव गाढवे यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला आणि दि. 6 ऑगस्ट 2026 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात शरण येण्याचे आदेश दिले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे गोरक्षनाथ मुसळे यांनी काम पाहिले, तर मूळ फिर्यादी योगेश गलांडे यांच्या वतीने ॲड. सागर वाव्हळ यांनी बाजू मांडली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *