• Thu. Jun 4th, 2026

आरपीआय युवक तालुकाध्यक्ष जयराम आंग्रे यांच्यावर जीवघेणा हल्ला; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

ByMirror

Jun 4, 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे एमआयडीसी पोलिसांना निवेदन


देहेरे गावातील दोन गटांच्या वादादरम्यान घडली घटना; कोयते, दांडके व लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील देहेरे (ता. नगर) येथे दोन गटांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर परिस्थिती पाहण्यासाठी गेलेल्या आरपीआय युवक आघाडीचे नगर तालुकाध्यक्ष जयराम सुरेश आंग्रे यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी आरोपींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने एमआयडीसी पोलिसांकडे करण्यात आली आहे.


यासंदर्भात आरपीआयच्या शिष्टमंडळाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन हेड कॉन्स्टेबल देविदास खेडकर यांना निवेदन दिले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय कांबळे, जिल्हा सरचिटणीस विजय भांबळ, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, कार्याध्यक्ष कृपाल भिंगारदिवे, सुरज भिंगारदिवे, शुभम ठोंबे, यशराज शिंदे, आकाश भिंगारदिवे, शुभम गायकवाड, संदीप वाघमारे, शुभम तोडमल, आनंद तागड, मायाताई जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देहेरे गावात दोन गटांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता. गावात मोठा आरडाओरडा आणि गोंधळ सुरू असल्याने नेमकी परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी जयराम आंग्रे घटनास्थळी गेले होते. मात्र, त्यावेळी नऊ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


हल्लेखोरांनी कोयते, बेसबॉल बॅट, दांडके आणि लोखंडी रॉडसारख्या घातक शस्त्रांचा वापर करून आंग्रे यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की, एवढी गंभीर घटना घडूनही संबंधित आरोपींवर अद्याप गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. तसेच या प्रकरणात पीडित असलेल्या जयराम आंग्रे यांच्याविरोधातच खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.


पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जयराम आंग्रे हे नगर तालुक्यात विविध सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावत असल्याने काही व्यक्तींनी पूर्वग्रहातून त्यांच्यावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. समाजातील वंचित घटकांच्या प्रश्‍नांसाठी ते सातत्याने आवाज उठवत असल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.


या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींना तातडीने अटक करावी, हल्लेखोरांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत आणि जयराम आंग्रे यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने करण्यात आली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने या प्रकरणात ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *