• Wed. Aug 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

महापुरुषांबाबत आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी भाळवणीच्या त्या डॉक्टरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ByMirror

Jun 4, 2026
कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा रघुनाथ आंबेडकर यांचा इशारा

सनद रद्द करून जिल्हाबंदीचे आदेश द्यावेत; जनहितार्थ जन आक्रोश असोसिएशनचे पोलीस अधीक्षकांना निवेदन


कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा रघुनाथ आंबेडकर यांचा इशारा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजन नायक कांशीराम यांच्याविषयी सोशल मीडियावर कथितरित्या अपमानकारक व आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाळवणी (ता. पारनेर) येथील डॉ. मंगेश बेकारसे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांची वैद्यकीय सनद रद्द करावी तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जिल्हाबंदीचे आदेश जारी करावेत, अशी मागणी जनहितार्थ जन आक्रोश असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.


या संदर्भात संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोशल मीडियावर करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह पोस्टमुळे जिल्हाभरातील आंबेडकरी समाजामध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


संघटनेच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कांशीराम यांच्याबद्दल अपमानास्पद मजकूर प्रसारित केल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या घटनेनंतर पारनेर तालुक्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच संबंधित व्यक्ती वारंवार पुरोगामी विचारसरणीविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करत असून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.


निवेदनात पुढे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील प्रेरणास्थान आहेत. अशा महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्ये किंवा पोस्ट करणे ही गंभीर सामाजिक विकृती असून अशा कृत्यांवर कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे.


जनहितार्थ जन आक्रोश असोसिएशनने प्रशासनाकडे संबंधित व्यक्तीची वैद्यकीय व्यवसायाची सनद रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाबंदीचे आदेश जारी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणात तातडीने आणि कठोर कारवाई न झाल्यास समाजहितासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (मार्केट यार्ड), अहिल्यानगर येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *