श्री संत नामदेव पायरी परिसरात राबविले स्वच्छता अभियान; भिंगार ते पंढरपूर भक्ती, सेवा आणि स्वच्छतेचा संदेश
हातात झाडू, ओठांवर विठ्ठल नामाने स्वच्छतेचा जागर
वारी म्हणजे केवळ भक्ती नव्हे, सामाजिक जबाबदारीही -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय पंढरी वारी उत्साह, भक्तिभाव आणि समाजप्रबोधनाच्या वातावरणात पार पडली. भक्ती, सेवा, सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छतेचा संगम या वारीतून सर्व सदस्यांना अनुभवायला मिळाला. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि अभंगांच्या सुरेल स्वरांत पंढरपूरकडे रवाना झालेल्या या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी “स्वच्छ वारी… सुंदर वारी” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला.
भिंगार येथील श्री रोकडेश्वर हनुमान मंदिरात महाआरती करून हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य बसने पंढरपूरकडे रवाना झाले. संपूर्ण प्रवासात विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. “ज्ञानोबा-तुकोबा”, “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” या गजरात वारकरी भक्तिभावाने तल्लीन झाले होते.
या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण वारीदरम्यान स्वच्छतेचा संदेश देत ठिकठिकाणी स्वच्छता करण्यात आली. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरी परिसरात सदस्यांनी हातात झाडू घेत स्वच्छता अभियान राबविले. परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
भाविकांनाही प्लास्टिकमुक्त वारी, स्वच्छ मंदिर परिसर आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. “देवदर्शनाइतकेच देवस्थान आणि परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक भाविकाची जबाबदारी आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभर आरोग्य जनजागृती, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान, सार्वजनिक स्वच्छता आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून यंदाही स्वच्छतेचा संदेश देणारी एकदिवसीय पंढरी वारी आयोजित करण्यात आली. समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याबरोबरच धार्मिक कार्यक्रमातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
या भक्तिमय आणि सेवाभावी वारीत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, जहीर सय्यद, दिलीप ठोकळ, अशोक पराते, ताराचंद ठोकळ, विकास भिंगारदिवे, रामनाथ गर्जे, सतीश सपकाळ, सरदारसिंग परदेशी, अविनाश पोतदार, डॉ. अतुल मडावी, राजेंद्र पांढरे, अशोक लोंढे, अशोक दळवी, नवनाथ वेताळ, जालिंदर अळकुटे, सुहास देवराईकर, मच्छिंद्र बेरड, रमेश साके, किसन गुंजाळ, राजेश तनपुरे, संतोष चोपडा, राजकुमार मोरे, उषाताई ठोकळ, सुरेखा आमले, नीता देवराईकर, उमा सोनसळे, आशाताई गर्जे, अश्विनी थोरात, रजनीताई परदेशी, लक्ष्मीताई गायकवाड, अनिता सोनवणे, योगिताताई, अर्चना खर्से, वर्षा काळे, रजनी परदेशी, निमल भिंगारदिवे, देविदास गंडाळ, विलास शिंदे, शब्बीर शेख, गोकुळ भांगे, दर्श गोंधळे, राजाराम थोरात, दत्तात्रय गोंधळे, हिरेंद्र मिश्रा, अनिल बनसोडे आदी सहभागी झाले होते.
संजय सपकाळ म्हणाले की, “पंढरपूरची वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती समाजप्रबोधनाची, सेवा आणि संस्कारांचे मोठे केंद्र आहे. संतांनी दिलेला भक्तीचा संदेश हा समाजहिताशी जोडलेला आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आपण लाखोंच्या संख्येने पंढरपूरला जातो, पण मंदिर परिसर आणि वारीचा मार्ग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही आपलीच आहे. आज आपण हातात टाळ-मृदंगाबरोबर झाडूही घेतला आहे. कारण स्वच्छता हीच खरी सेवा आहे आणि सेवेतूनच ईश्वरप्राप्तीचा मार्ग सापडतो. प्रत्येक वारकऱ्याने आपल्या घराप्रमाणेच मंदिर, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला, तर ‘स्वच्छ भारत’चे स्वप्न साकार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकदिवसीय पंढरी वारीनिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी वारी मार्ग तसेच मंदिर परिसरात स्वच्छता करत भाविकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याचे आवाहन केले. प्लास्टिकचा वापर टाळणे, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असा संदेश या अभियानातून देण्यात आला. सर्वांनी विठ्ठल चरणी राज्याच्या सुख-शांतीसाठी, समाजातील ऐक्यासाठी आणि सर्वांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली.

