अहिल्यानगर लक्झरी बस असोसिएशन व ट्रॅव्हल्स असोसिएशनचा उपक्रम; पाच हजारांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला लाभ
सलग तिसऱ्या वर्षी वारकरी सेवेसाठी पुढाकार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेली आषाढी वारी ही केवळ श्रद्धेची यात्रा नसून सेवाभाव, समर्पण आणि समाजातील एकात्मतेचे जिवंत उदाहरण आहे. “ज्ञानोबा-तुकाराम”चा अखंड गजर करत लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. या भक्तांच्या सेवेसाठी दरवर्षी विविध सामाजिक संस्था आणि संघटना पुढाकार घेत असतात. याच सेवाभावी परंपरेचा वारसा जपत अहिल्यानगर लक्झरी बस असोसिएशन व ट्रॅव्हल्स असोसिएशन यांच्या वतीने यंदाही सलग तिसऱ्या वर्षी वारकरी बांधवांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी व फराळाचे वाटप करण्यात आले. शहरातून मार्गस्थ झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला, या उपक्रमामध्ये पाच हजारांहून अधिक वारकरी बांधवांना सेवा देण्यात आली.
श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. दिंड्यांमधून येणाऱ्या वारकरी बांधवांवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. यावेळी वातावरण भक्तिमय झाले होते. विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना प्रेमाने पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे, वेफर्स, फराळी चिवडा आणि चिक्कीचे वाटप करण्यात आले. उन्हाचा तडाखा आणि दीर्घ पायी प्रवासामुळे थकलेल्या वारकऱ्यांसाठी हा अल्पोपहार मोठा दिलासा ठरला.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे असोसिएशनमधील सर्व गाडी मालक, चालक, पदाधिकारी आणि सदस्यांनी स्वतः उपस्थित राहून सेवा केली. आपल्या व्यावसायिक कामातून वेळ काढून सर्वांनी स्वतः वारकऱ्यांना पाणी व फराळ देत त्यांच्या सेवेत सहभाग घेतला. संस्थापक अध्यक्ष शिवाजी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. दरवर्षी हजारो वारकऱ्यांना सेवा देण्याची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली. समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि वारकरी संप्रदायाविषयी असलेला आदर याचे दर्शन या उपक्रमातून घडले. “वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलाची सेवा” या भावनेने सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी एकदिलाने काम केले.
यावेळी अध्यक्ष शिवाजी उबाळे, उपाध्यक्ष (उपनगर) अमोल भांड, उपाध्यक्ष प्रमोद बेदमुथ्या, सेक्रेटरी रियाज मुलानी, खजिनदार गणेश गायकवाड, सचिव ईश्वर धोका, सहसचिव धर्मा वाघस्कर, प्रवक्ते सरवर कुरेशी, संघटक गणेश उपाध्ये व आपला मावळा महिला प्रदेशध्यक्षा ,प्रसिद्धी प्रमुख प्रियंका पाटील शेळके यांच्यासह असोसिएशनचे सर्व गाडी मालक, चालक आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडत वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली.
वारकरी बांधवांनीही आयोजकांच्या सेवाभावी वृत्तीचे मनापासून कौतुक केले. अनेक वारकऱ्यांनी आयोजकांना आशीर्वाद देत अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. सलग तिसऱ्या वर्षी हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ पाणी व फराळ वाटपापुरता मर्यादित न राहता “सेवा, समर्पण आणि विठ्ठल भक्ती” यांचा सुंदर संगम ठरला. समाजातील विविध घटकांनी अशा सेवाभावी उपक्रमातून प्रेरणा घेऊन समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हावे, असा संदेशही या निमित्ताने देण्यात आला.

