• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

सावेडीगावातून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या दिंडीचे ‘रोज एक गाव, एक झाड’चा पर्यावरणपूरक उपक्रम

ByMirror

Jul 17, 2026
विठ्ठलाचा प्रसाद म्हणून वृक्षांचे संवर्धनाने दिंडी मार्गावर हिरवाई फुलणार -लतिकाताई पवार

वारीसोबत हरित वारीचा संदेश; प्रत्येक मुक्कामावर होणार वृक्षारोपण; चंद्रभागेच्या तीरावर होणार अभियानाची सांगता


विठ्ठलाचा प्रसाद म्हणून वृक्षांचे संवर्धनाने दिंडी मार्गावर हिरवाई फुलणार -लतिकाताई पवार


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीच्या पवित्र पर्वानिमित्त शहरातील सावेडीगाव येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीचे नुकतेच अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. ह.भ.प. चंद्रकांत महाराज बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांनी “ज्ञानोबा-तुकोबा”, “माऊली… माऊली…” अशा जयघोषात टाळ-मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या अखंड गजरात दिंडीला सुरुवात केली. पारंपरिक भक्ती, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही दिंडी यंदा विशेष ठरत आहे.


यंदाच्या वारीत “रोज एक गाव एक झाड” हा संकल्प राबविण्यात येत असून, दिंडी ज्या-ज्या गावांमध्ये मुक्काम करेल त्या प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. लिनेस क्लब व निसर्ग व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळाच्या जिल्हाध्यक्षा लतिकाताई पवार यांच्या पुढाकारातून हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करत भाविकांच्या मनात वृक्षसंवर्धनाची भावना रुजविण्याचा या अभियानामागील प्रमुख उद्देश आहे.
या अभियानाची सुरुवात नगर तालुक्यातील साकत येथे बाजीराव गायकवाड यांच्या निवासस्थानी चिकूच्या रोपाची लागवड करून करण्यात आली. दिंडीच्या मुक्कामस्थळी भाविकांना प्रसादस्वरूप रोपे देण्यात येत असून, त्या रोपांचे संगोपन करण्याचा निर्धारही ग्रामस्थांनी व्यक्त केला. दिंडीची आठवण म्हणून ही झाडे भविष्यात पर्यावरणाचे रक्षण करतील, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


दिंडीचा प्रवास जसा भक्तीचा आहे, तसाच तो पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा ठरणार आहे. या उपक्रमाचा समारोप श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या तीरावर वृक्षारोपण करून करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी नगरसेवक तथा राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर आणि उपमहापौर धनंजय जाधव यांनी विविध देशी प्रजातींची तसेच फळझाडांची रोपे उपलब्ध करून दिली. त्यामुळे संपूर्ण वारी मार्गावर स्थानिक हवामानाला पूरक वृक्षांची लागवड होणार असून पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार आहे.


ह.भ.प. चंद्रकांत महाराज बारस्कर व ह.भ.प. लताताई महाराज बारस्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या जिल्हाध्यक्षा लतिकाताई पवार, कार्याध्यक्षा छायाताई राजपूत, अशोक वाकळे, बाळासाहेब वाकळे, देवीदास बारस्कर, तुकाराम बारस्कर, राजेंद्र बारस्कर, सुषमा दंडवते, पुष्पा वाकळे, मंदा वाकळे, शांता गाडे, गंगू वाघ, अलका गाडे, शरद देशपांडे, संपत बारस्कर, संगीता देव्हारे यांच्यासह वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह.भ.प. चंद्रकांत महाराज बारस्कर म्हणाले की, वारी ही केवळ पंढरपूरकडे चालण्याची परंपरा नसून ती आत्मशुद्धी, समाजप्रबोधन आणि सेवाभावाची जीवनशाळा आहे. संतांनी दिलेला निसर्गप्रेमाचा आणि सर्व जीवमात्रांविषयी करुणेचा संदेश आपण कृतीत उतरविणे ही काळाची गरज आहे. विठ्ठलभक्ती करताना पर्यावरणाचे रक्षण करणे हेही आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.


लतिकाताई पवार म्हणाल्या की, आज हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि कमी होत चाललेले वृक्ष हे संपूर्ण मानवजातीसमोरील गंभीर प्रश्‍न आहेत. या पार्श्‍वभूमीवर वारीसारख्या लोकचळवळीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘रोज एक गाव, एक झाड’ हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित नसून प्रत्येक लावलेल्या रोपाचे संगोपन व्हावे, ही त्यामागील भावना आहे. प्रसाद म्हणून दिलेले रोप जपले गेले, तर ते भविष्यात हजारो लोकांना सावली, फळे आणि शुद्ध प्राणवायू देईल. संतांच्या विचारातून प्रेरणा घेत प्रत्येकाने निसर्गरक्षणाचा संकल्प करावा, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश त्यांनी स्पष्ट केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *