जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने
आंदोलनकर्त्यांवरील दडपशाही बंद करुन केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा घेण्याची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिल्ली येथील जंतर-मंतरवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक, विद्यार्थी नेत्या कॉ. नेहा बोरा, अभिजित दिपके आणि इतर आंदोलनकर्त्यांवर होत असलेल्या कथित लाठीचार्ज व दडपशाहीच्या निषेधार्थ भारतीचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनच्या वतीने मंगळवारी (दि.21 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करून निषेध नोदविण्यात आला.
यावेळी आंदोलकांनी शिक्षणमंत्र्यांचा धिक्कार असो, मोदी सरकार हाय हाय, शिक्षण मंत्री राजीनामा द्या, आंदोलनकर्त्यांवरील दडपशाही बंद करा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. निदर्शनानंतर आंदोलकांच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेचे नायब तहसीलदार मयूर बेरड यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे. या आंदोलनात कॉ. राजेंद्र बावके, कॉ. राजू वैराळ, कॉ. मदिना शेख, कॉ. जीवन सुरुडे, कॉ. विनायक गोरखे, अनिल बोरसे,आकाश शिंदे, आसरू बर्डे, विजय राहीज, गणपत जाधव, बाळासाहेब खाडे, भास्कर जाधव, शिवाजी पवार, बजरंग गुंड, राहुल पवार आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
निवेदनात सोनम वांगचुक, कॉ. नेहा बोरा व इतर आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच नीट (NEET), यूजीसी-नेट, टीईटी, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणांची स्वतंत्र न्यायिक चौकशी करावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, पेपरफुटीविरोधी कठोर कायदा करावा, पाशवी बळावर लोकशाहीची गळचेपी थांबवा, शिक्षणाचे व्यापारीकरण थांबवावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
तसेच आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या शेतकरी व इतर नागरिकांना अडवण्याचाही प्रयत्न सरकार करत असून त्याचाही निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली. आंदोलनकर्त्यांवरील दडपशाही, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि शिक्षण क्षेत्रातील वाढत्या भ्रष्टाचाराचा त्यांनी निषेध करण्यात आला.

