रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत दिला आपुलकीचा आधार
‘समाजसेवेतूनच खरी लोकसेवा’ -प्रदीप मकासरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित, गरजू आणि विशेष गरजा असलेल्या मुलांप्रती सामाजिक बांधिलकी जपत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने तपोवन रोड येथील मतिमंद मुलांच्या निवासी विद्यार्थी वस्तीगृहात मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या प्रेरणेने जिल्हाध्यक्ष प्रदीप मकासरे यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रेमाने भोजन वाढण्यात आले. त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधत कार्यकर्त्यांनी काही आनंदाचे क्षण विद्यार्थ्यांसोबत घालवले.
सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि सेवाभावाची भावना जोपासणारा हा उपक्रम राबविण्यात आला होता. या प्रसंगी शहराध्यक्ष हरिश आल्हाट, युवक शहराध्यक्ष संदीप वाघमारे, संघटक दिनेश पंडित, वांबोरी शहराध्यक्ष आकाश मकासरे, संदीप साळवे, महेश शेलार, प्रदीप शेलार, आकाश महासकरे, विराज महासकरे, रोहित महासकरे तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष प्रदीप मकासरे म्हणाले की, “समाजातील विशेष गरजा असलेल्या मुलांना प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीची गरज असते. त्यांच्यासोबत काही क्षण घालवणे, त्यांच्या आनंदात सहभागी होणे हीच खरी समाजसेवा आहे. प्रत्येकाने आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून अशा संस्थांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. सेवा, समता आणि बंधुभाव हीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची खरी शिकवण आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहराध्यक्ष हरिश आल्हाट म्हणाले की, राजकारणाबरोबरच समाजकारणाची जबाबदारी पार पाडणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विशेष मुलांना आधार मिळतो, तसेच समाजात संवेदनशीलतेची भावना अधिक दृढ होते. प्रत्येक सण, वाढदिवस किंवा विशेष दिवस गरजूंसोबत साजरा करण्याची संस्कृती वाढणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
वस्तीगृहाच्या मुख्याध्यापिका कल्पना भनगडे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. विशेष मुलांप्रती दाखविलेला जिव्हाळा आणि आपुलकी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी शिक्षिका संपदा केदार, प्रज्ञा गायकवाड, शितल काळोखे, सौम्य केदार, शंकर पाखरे आणि शिवाजी मुंडकर उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.

