भक्तीबरोबरच आरोग्यसेवेचा वसा!
नवरात्र उत्सव काळात चालणाऱ्या मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात साजऱ्या होत असलेल्या या नवरात्रोत्सवात ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेचा विशेष जागर केला आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भक्तीबरोबरच आरोग्याची काळजी घेता यावी, या उद्देशाने विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्ट आणि आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.13 ऑक्टोबर) आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अनेक भाविकांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हिमोग्लोबीन आदी विविध आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांनी भाविकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करून नियमित तपासणी, योग्य आहार आणि आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण कामाच्या व्यापामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर आजारांचे निदान उशिरा होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात येणाऱ्या भाविकांना आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येत आहे. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून समाजामध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरत आहे.
श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे आणि सचिन कोतकर यांच्या उपस्थितीत विविध आरोग्य शिबिर पार पाडत आहे. या शिबिरात डॉ. सुकेश बिश्वास आणि डॉ. विशाखा भळगट यांनी भाविकांची आरोग्य तपासणी केली.
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत एमआयडीसी पंचक्रोशीतील कामगार वर्ग असलेल्या भाविकांना विविध प्रकारच्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यावर देवस्थान ट्रस्टने भर दिला आहे. यामध्ये दंत तपासणी, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, सांधेदुखी तपासणी, हृदयविकार तपासणी, सर्वरोग निदान शिबिर तसेच मुतखडा आणि मूत्राशयासंबंधी आजारांच्या तपासणीचा समावेश आहे. या विविध शिबिरांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना प्राथमिक तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे संभाव्य आजारांचे वेळीच निदान होण्यास मदत होणार असून, आरोग्याविषयी जागरूकताही वाढणार आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर म्हणाले की, वेळीच आरोग्य तपासणी केल्यास अनेक गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी किंवा त्यावर योग्य वेळी उपचार सुरू करण्यासाठी मदत होते. नागरिकांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करून घ्यावी. नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून भाविकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रस्टचे सचिव दत्तात्रय विटेकर यांनीही भाविक आणि नागरिकांना आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

