• Fri. Jun 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

रामवाडीतील कचरा वेचक, कष्टकरी व कामगार वर्गातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

ByMirror

Dec 20, 2024
स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरचा उपक्रम

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरचा उपक्रम

झोपडपट्टी भागात आरोग्याची जागृती होणे आवश्‍यक -विकास उडानशिवे

नगर (प्रतिनिधी)- स्नेहालय संचलित केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने रामवाडी येथील कचरा वेचक, कष्टकरी व कामगार वर्गातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचे जिल्हा समन्वयक विकास उडानशिवे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. गणपत वसावे, समुपदेशक गौरी लोणारे, लॅब टेक्निशियन वैशाली पंडोरे, सिस्टर दिपाली भांबळ, राखी देसले, विशाल खताडे, विनायक महाले, बालभवनचे केंद्र समन्वयक सचिन वाघ, जयश्री शिंदे, आशा खाला, अनिता सामल, शमा सय्यद आदी उपस्थित होत्या.


विकास उडानशिवे म्हणाले की, झोपडपट्टी भागात आरोग्याची जागृती होणे आवश्‍यक आहे. गंभीर आजार झाल्यावर नागरिक औषधोपचारासाठी धावतात. मात्र वेळेवर आजाराचे निदान झाल्यास भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात. वेळोवेळी तपासणीला पैसे नसल्याने इच्छा असताना देखील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटलने झोपडपट्टीतील नागरिकांच्या आरोग्यासाठी उचलेले पाऊल गरजूंना आधार देणारे आहे. आरोग्य सेवा हीच खरी ईश्‍वर सेवा आहे. आरोग्य सेवेतून एखाद्याचे जीव वाचविण्याचे समाधान संस्थेला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. गणपत वसावे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांची विविध आरोग्य तपासणी करुन सदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शन केले. तर या हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजू घटकांना मोफत व अल्पदरात आरोग्य सुविधा दिल्या जाणार असल्याची माहिती दिली. या शिबिरात किमान दोनशे पेक्षा जास्त नागरिकांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करुन त्यांना मोफत औषधे देण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *