• Thu. Jun 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

मिरीत ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी

ByMirror

Dec 2, 2024
मिरीत ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी

29 गरजू रुग्णांवर होणार मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया

ग्रामीण भागात आरोग्याबद्दल जागृती निर्माण करुन, आरोग्य सेवा पोहचविणे महत्त्वाचे -आदिनाथ वनारसे

नगर (प्रतिनिधी)- पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्था व बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने मिरी (ता. पाथर्डी) येथील ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तर शिबिरातील 29 गरजू रुग्णांवर मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे. या शिबिरास गावाच्या पंचक्रोशी परिसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. वेताळ सामाजिक संस्था मागील 23 वर्षापासून गरजूंना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देत असून, संस्थेचे हे 231 वे शिबिर होते.


शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा कांदा व्यापारी आदिनाथ वनारसे यांच्या हस्ते झाले. ह.भ.प. गिरीधारी डहाळे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
आदिनाथ वनारसे म्हणाले की, ग्रामीण भागात आरोग्याबद्दल जागृती निर्माण करुन, आरोग्य सेवा पोहचविणे महत्त्वाचे बनले आहे. सातत्याने पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्था विविध उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देत आहे. सर्वसामान्य वर्गाला महागाईच्या काळात आरोग्यसेवा घेणे परवडत नाही. सर्वसामान्यांची सोय होण्यासाठी आरोग्य शिबिर नागरिकांसाठी आधार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
ह.भ.प. गिरीधारी डहाळे महाराज यांनी संस्थेच्या माध्यमातून माणुसकीच्या भावनेने राबविण्यात येणारे शिबिराचे उपक्रम दिशादर्शक असल्याचे स्पष्ट करुन संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. शिवाजी वेताळ म्हणाले की, समाज निरोगी करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आरोग्य चळवळ उभी करण्यात आली आहे. समाजात आरोग्याचे प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.


या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी 221 ग्रामस्थांची तपासणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. स्नेहा शिवाजी वेताळ यांनी केले. अनिता शिवाजी वेताळ यांनी आभार मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *