• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांची मोफत कॅन्सर तपासणी

ByMirror

Oct 17, 2024
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांची मोफत कॅन्सर तपासणी

विविध प्रकारच्या थेरपी व उपचार अल्पदरात उपलब्ध

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्य मंदिरात रुग्णसेवेसाठी भंडारी परिवारातील दुसऱ्या पिढीचे योगदान -आशाबाई भंडारी

नगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटल नवजीवन देण्याचे काम करीत आहे. आरोग्य शिबिर घेऊन सर्वसामान्यांना आधार दिला जात आहे. सर्वसामान्यांच्या व्याधी मुक्तीसाठी रुग्णसेवेच्या आरोग्य मंदिरात रुग्णसेवेसाठी भंडारी परिवारातील दुसऱ्या पिढीचे योगदान सुरु असल्याचे प्रतिपादन आशाबाई भंडारी यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्व. डॉ. पोपटलालजी भंडारी व स्व. राजीबाई रायचंदजी भंडारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ डॉ. आशिष भंडारी व भंडारी परिवाराच्यावतीने आयोजित मोफत कॅन्सर तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आशाबाई भंडारी बोलत होत्या. याप्रसंगी, कांतीलाल भंडारी, डॉ. आशिष भंडारी, पायल भंडारी, भागचंद भंडारी, छाया भंडारी, विलास चेंगडे, सुनील गुगळे, किरण भंडारी, काव्या भंडारी, आदित्य भंडारी, डॉ. वसंत कटारिया, सीए आयपी अजय मुथा, डॉ. प्रकाश कांकरिया, सतीश (बाबूशेठ) लोढा, प्रकाश छल्लाणी, मानकचंद कटारिया, सुभाष मनोत, वसंत चोपडा, कॅन्सर सर्जन डॉ. अनिकेत शिंदे आदी उपस्थित होते.


पुढे आशाबाई भंडारी म्हणाल्या की, स्व. डॉ. पोपटलालजी भंडारी यांनी मिरजगाव येथे 30 वर्ष आरोग्य सेवा दिली. पंचक्रोशीतील फॅमिली डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती होती. त्यानंतर ते आनंदऋषीजी हॉस्पिटलचे पहिले डॉक्टर म्हणून रुजू झाले. त्यांच्या स्वर्गवासानंतर आमचा मुलगा डॉ. आशिष भंडारी हे रुग्णसेवेचा वारसा पुढे चालवत आहे. हॉस्पिटलच्या पायाभरणीपासून भंडारी परिवार या हॉस्पिटलचा अविभाज्य अंग बनला आहे. भंडारी परिवारावर कायम आचार्य श्रींची कृपा व प्रबुध्द विचारक आदर्शऋषीजी महाराज यांचे आशिर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात डॉ. वसंत कटारिया म्हणाले की, हॉस्पिटल चालवणे अत्यंत अवघड काम असून, यामध्ये एकही घडलेली चूक एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. मात्र प.पू. आनंदऋषी महाराजांच्या आशिर्वादाने डॉ. आशिष भंडारी सर्व हॉस्पिटलचे व्यवस्थापन उत्तमपणे बघते आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलची प्रगती झपाट्याने सुरु असून, विविध विभाग कार्यान्वीत होऊन दर्जेदार आरोग्यसेवा सर्वसामान्यांना मिळत आहे. त्यांचे वडील देखील चांगले डॉक्टर होते, त्यांनी हॉस्पिटलच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. हॉस्पिटलच्या उभारणीपासून भंडारी परिवाराचे योगदान राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.
अजय मुथा म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु असलेला मानवसेवेचा वसा भंडारी परिवार पुढे घेऊन जात आहे. डॉ. आशिष भंडारी सर्व यंत्रणा हाताळून निष्ठेने कार्य करत असून, हॉस्पिटलचा कणा म्हणून त्यांची भूमिका व योगदान आहे. सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर सारखा महत्त्वाचा विभाग सुरू झाला आहे. या विभागात तज्ञ डॉक्टर व अद्यावत आरोग्य यंत्रणा सेवेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. अनिकेत शिंदे म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांसाठी केमोथेरपी व रेडिएशनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. काही महिन्यातच हा विभाग सुसज्ज आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून सेवा देत असून, अनेक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. कॅन्सर झाले म्हणजे मनुष्याचे जीवन संपत नाही, त्याचे वेळेवर निदान होऊन योग्य उपचार झाल्यास तो व्यक्ती बरा होत असल्याचे त्यांनी सांगितले.


डॉ. प्रकाश कांकरिया यांनी या मानवतेच्या मंदिरात शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन रयतेच्या आरोग्यासाठी डॉ. आशिष भंडारी योगदान देत असल्याची भावना व्यक्त केली. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले. या शिबीरात 66 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. गरजेनुसार रुग्णांवर विविध प्रकारच्या थेरपी व उपचार अल्पदरात केल्या जाणार आहेत. तर महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार मोफत होणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *