कॅन्सरला घाबरू नका; वेळेवर उपचारच देतात नवजीवन -डॉ. अनिकेत शिंदे
रुणवाल परिवाराचा कॅन्सर रुग्णांसाठी सेवाभावी पुढाकार; १४५ रुग्णांची मोफत तपासणी, महात्मा फुले योजनेअंतर्गत केमोथेरपीची सुविधा उपलब्ध
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “कॅन्सर म्हणजे मृत्यूचा नाही, तर वेळेवर उपचार न घेतल्यास निर्माण होणारा धोका आहे. आज वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक उपचारपद्धतीमुळे कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे भीती न बाळगता लक्षणे दिसताच तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर केलेले उपचार रुग्णाला नवजीवन देतात,” असे प्रतिपादन प्रख्यात कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अनिकेत शिंदे यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे संथारा व्रतधारी स्व. श्रीमती पानाबाई लक्ष्मीचंदजी रुणवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अजय रुणवाल व सतीश मंगलाजी रुणवाल (बिजापूर, पुणे) यांच्या सहकार्याने आयोजित मोफत कॅन्सर तपासणी व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पेमराज बोथरा, सौ. मनीषा बोथरा, संतोष बोथरा, संगीता बोथरा, सतीश बोथरा, प्रतिभा बोथरा, बाबूशेठ लोढा, तेजल पगारिया (नागपूर), माणकचंद कटारिया, डॉ. आशिष भंडारी, डॉ. तुषार मुळे, डॉ. भक्ती फाळके, डॉ. सोनाली सोलट आणि डॉ. निकिता जैन (कटारिया) यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. शिंदे पुढे म्हणाले की, भारतात दरवर्षी सुमारे १४ लाख नव्या कॅन्सर रुग्णांचे निदान होते. तंबाखूचे सेवन हे जवळपास ४० टक्के कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याने नियमित तपासणी, जनजागृती आणि लक्षणे ओळखून त्वरित उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे. पुरुषांनी तोंडातील न भरून येणारी जखम किंवा पांढरे चट्टे, तर महिलांनी स्तनामध्ये गाठ किंवा मासिक पाळीतील असामान्य बदल याकडे दुर्लक्ष करू नये, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत ४०० हून अधिक कॅन्सर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या असून महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत केमोथेरपीची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही गुणवत्तापूर्ण कॅन्सर उपचार सहज उपलब्ध होत आहेत.
प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले की, समाजात वाढत चाललेल्या कॅन्सरच्या समस्येची गंभीर दखल घेत हॉस्पिटलमध्ये आधुनिक सुविधा, अत्याधुनिक उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र कॅन्सर विभाग सुरू करण्यात आला आहे. ‘सेवा सर्वोच्च परमोधर्म’ या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवून अल्पदरात, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक उपचार देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जात आहे. रुग्णांच्या उपचाराचा आर्थिक भार कमी करण्यासाठी विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जात असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा संकल्प हॉस्पिटलने केला आहे.
ते पुढे म्हणाले की, रुणवाल परिवाराने आरोग्यसेवेसाठी सातत्याने दिलेले निस्वार्थ योगदान हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या सहकार्यामुळे अनेक गरजू कॅन्सर रुग्णांना उपचाराची नवी आशा मिळत असून अशा सेवाभावी उपक्रमांमुळे समाजात आरोग्याविषयी विश्वास आणि जागरूकता निर्माण होत आहे.
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवाकार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या सौ. मंगलाताई रुणवाल यांच्या साठव्या वाढदिवसानिमित्त हॉस्पिटलच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
तेजल पगारिया यांनी रुणवाल परिवाराच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत, समाजाच्या गरजा ओळखून आरोग्यसेवेत दिलेले त्यांचे योगदान अनुकरणीय असल्याचे सांगितले. भविष्यातही अशा जनकल्याणकारी आरोग्य उपक्रमांना हातभार लावण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
डॉ. तुषार मुळे यांनी कॅन्सर रुग्ण शोधण्याइतकेच समाजात जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. नियमित तपासणी, सात्त्विक आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैली यामुळे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. नागरिकांनी अशा आरोग्य शिबिरांचा लाभ घेऊन स्वतःच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिरात १४५ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. गरजेनुसार रुग्णांवर अल्पदरात शस्त्रक्रिया, तसेच विविध प्रकारच्या थेरपी आणि कॅन्सर उपचारांवर विशेष सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले, तर बाबूशेठ लोढा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

