तीनशेपेक्षा अधिक बालकांना पोलिओचे डोस; कष्टकरी पंचायतेकडून प्रभावी जनजागृती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. 28 जून) रामवाडी परिसरात महापालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून पोलिओ लसीकरण मोहिम उत्साहात राबविण्यात आली. रामवाडी आरोग्य केंद्रात आयोजित या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लहान बालकांना पोलिओसारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळावे आणि प्रत्येक बालकाचे शंभर टक्के लसीकरण व्हावे, या उद्देशाने कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, अहिल्यानगर शाखेच्या वतीने योगदान देण्यात आले. रामवाडी आणि परिसरातील कष्टकरी, स्थलांतरित व कामगार कुटुंबांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन जनजागृती करण्यात आली.
रामवाडी आरोग्य केंद्रात सकाळपासूनच आपल्या चिमुकल्यांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी केली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण प्रक्रिया पार पाडत प्रत्येक बालकाला सुरक्षितपणे पोलिओचे डोस दिले. दिवसभरात तीनशेपेक्षा अधिक बालकांचे लसीकरण करण्यात आल्याने ही मोहीम यशस्वी ठरली.
रामवाडी आरोग्य केंद्राच्या परिचारिका रोहिणी बोरुडे आणि सेविका नीता उडानशिवे यांनी बालकांना पोलिओचे डोस देण्याचे काम जबाबदारीने पार पाडले. लसीकरणादरम्यान पालकांना पोलिओ प्रतिबंधाचे महत्त्व, नियमित लसीकरणाचे फायदे तसेच राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे उद्दिष्ट याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
पोलिओमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेदरम्यान पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत. प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचल्यासच पोलिओसारख्या आजारावर कायमस्वरूपी मात करणे शक्य होईल, असा विश्वास विकास उडाणशिवे यांनी व्यक्त केला.

