अतिथी देवो भव’ची अनोखी अनुभूती; 23 दिवसांच्या भारत भ्रमंतीत संस्कृती, सेवा आणि मैत्रीचा सुंदर संगम
तुर्कस्तान, बेल्जियम, डेन्मार्क आणि हंगेरीच्या युवा प्रतिनिधींनी अनुभवली भारतीय कुटुंबव्यवस्था, परंपरा आणि सेवाभाव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संस्कृतीतील “अतिथी देवो भव” या मूल्याचा जिवंत अनुभव देणारा लायन्स इंटरनॅशनल युवा देवाणघेवाण कार्यक्रम सध्या महाराष्ट्रात उत्साहात सुरू असून, जगातील विविध देशांतील 38 युवा प्रतिनिधी भारतात दाखल झाले आहेत. या प्रतिनिधींमध्ये चार युवा प्रतिनिधी अहिल्यानगरात, तीन प्रतिनिधी पुण्यात, तर उर्वरित प्रतिनिधी मुंबईतील लायन्स सदस्यांच्या कुटुंबात वास्तव्यास असून, भारतीय संस्कृती, परंपरा, कुटुंबव्यवस्था आणि सेवाभावाचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत.
या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन लायन्स मल्टिपल डिस्ट्रिक्टचे यूथ एक्स्चेंज चेअरमन लायन दिपेश जोशी (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, अहिल्यानगरातील आयोजनाची जबाबदारी लायन्स क्लब ऑफ अहमदनगरने यशस्वीपणे पार पाडली आहे. अहिल्यानगरात वास्तव्यास असलेले चार युवा प्रतिनिधी म्हणजे तुर्कस्तानची अभिनेत्री डेफ्ने एर्सेन (Defne Ersen), बेल्जियमची ईव्हा-लुना बेलॉय (Eva-Luna Beloy), डेन्मार्कचा एलियट केलर लॉरिट्झेन (Elliot Keller Lauritzen) आणि हंगेरीचा फाबोक मॅत्यास (Fabok Matyas) हे होत. विविध संस्कृती, भाषा आणि परंपरा घेऊन आलेल्या या युवकांनी अल्पावधीतच भारतीय जीवनशैलीशी एकरूप होत अहिल्यानगरकरांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.
23 दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय युवा देवाणघेवाण कार्यक्रमात पहिल्या 11 दिवसांसाठी प्रतिनिधींना भारतीय यजमान कुटुंबात राहण्याची संधी देण्यात आली. या कालावधीत त्यांनी भारतीय कुटुंबव्यवस्था, संस्कृती, खाद्यपरंपरा, सण-उत्सव आणि दैनंदिन जीवनशैलीचा जवळून अनुभव घेतला. त्यानंतर सर्व 38 प्रतिनिधी दिल्ली, जयपूर आणि आग्रा या ऐतिहासिक शहरांच्या अभ्यासदौऱ्यावर जाणार असून, कार्यक्रमाच्या शेवटच्या पाच दिवसांत मुंबई येथे आयोजित आंतरराष्ट्रीय युवा शिबिरात सहभागी होऊन भारतातील अनुभव मांडणार आहेत. तसेच आपल्या-आपल्या देशांची संस्कृती, परंपरा आणि वैशिष्ट्येही ते सादर करणार आहेत.
अहिल्यानगरातील वास्तव्यात डेफ्ने एर्सेन या हरजीतसिंग वाधवा यांच्या कुटुंबात, ईव्हा-लुना बेलॉय या सी.ए. राजेंद्र काळे यांच्या कुटुंबात, एलियट केलर लॉरिट्झेन हे लायन सुनील छाजेड यांच्या कुटुंबात, तर फाबोक मॅत्यास हे लायन किरण भंडारी यांच्या कुटुंबात राहिले. काही दिवसांतच हे प्रतिनिधी पाहुणे न राहता त्या-त्या कुटुंबातील सदस्य बनले. भारतीय कुटुंबव्यवस्थेतील जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि एकमेकांप्रती असलेली आत्मीयता त्यांनी मनापासून अनुभवली.
अहिल्यानगरातील मुक्कामादरम्यान या युवा प्रतिनिधींनी आषाढी एकादशी दिंडीत सहभाग घेतला, स्थानिक महिलांसोबत फुगडी खेळली, तालयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती ढोल वाजविण्याचा अनुभव घेतला तसेच भारतीय पोळी (रोटी) बनविणेही शिकले. त्यांनी उत्साहाने मराठी, हिंदी आणि पंजाबी भाषेतील दैनंदिन शब्द, अभिवादन आणि संवाद शिकून स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि इतिहासाची ओळख करून घेण्यासाठी त्यांनी ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर, गुरुद्वारा भाई दयासिंगजी, अवतार मेहेर बाबा समाधीस्थळ, आनंदधाम, शिर्डी, श्री शनिशिंगणापूर, साई तीर्थ, जागतिक वारसा स्थळ वेरूळ लेणी, पुण्यातील शनिवारवाडा, आगाखान पॅलेस तसेच मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आणि ताज महाल पॅलेस हॉटेल यांसारख्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी देत भारताच्या समृद्ध वारशाचा जवळून अनुभव घेतला.
या दौऱ्यातील सर्वाधिक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव त्यांना गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानच्या ‘घर घर लंगर सेवा’ प्रकल्पात आला. दररोज शेकडो गरजूंना प्रेमाने तयार केलेले ताजे अन्न वाटण्याची सेवा पाहून ते भारावून गेले. “सेवा हीच सर्वोच्च मानवता” हा शीख धर्माचा संदेश त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला आणि भारतीय समाजातील निःस्वार्थ सेवाभावाला मनापासून दाद दिली. युवा प्रतिनिधींनी रामकृष्ण ज्युनिअर कॉलेज व शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. त्यांनी आपल्या देशातील शिक्षणपद्धती, संस्कृती, परंपरा आणि जीवनशैलीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्याचबरोबर भारतीय विद्यार्थ्यांकडून भारताची संस्कृती, शिक्षणव्यवस्था आणि सामाजिक मूल्यांविषयी जाणून घेतले. या संवादातून परस्पर आदर, जागतिक मैत्री आणि बंधुभाव अधिक दृढ झाला.
लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या पदग्रहण समारंभात चारही प्रतिनिधींनी भारतातील आपल्या अनुभवांविषयी मनोगत व्यक्त केले. भारतीय कुटुंबव्यवस्थेतील प्रेम, वडीलधाऱ्यांप्रती आदर, अध्यात्म, स्वयंसेवेची परंपरा आणि भारतीय पाहुणचार याबद्दल त्यांनी विशेष कौतुक व्यक्त केले. “आम्ही भारतात पर्यटक म्हणून आलो होतो; पण आता आम्हाला दुसरे कुटुंब मिळाले असून, आयुष्यभरासाठी जपण्यासारख्या आठवणी घेऊन परत जात आहोत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांचे हे मनोगत ऐकताना अनेक उपस्थित भावूक झाले आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदित्य छाजेड, गुरनूरसिंग वाधवा, सई काळे, दिपेश कोठारी, डॉ. सिमरनकौर वाधवा, प्रणिता भंडारी आणि भावना छाजेड यांनी निवास, प्रवास, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दैनंदिन समन्वयाची जबाबदारी अत्यंत आत्मीयतेने पार पाडली. लायन्स क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष हरजीतसिंग वाधवा, सचिव हरीश हरवानी आणि कोषाध्यक्ष विजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. तसेच माजी अध्यक्ष संजय आसनानी, प्रशांत मुनोत, दिलीप कुलकर्णी आणि धनंजय भंडारे यांचेही या उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

