• Fri. Aug 7th, 2026

Mirrornews24

Marathi News

स्वातंत्र्यदिनानिमित्त अहिल्यानगरात भव्य सांस्कृतिक महोत्सव

ByMirror

Aug 7, 2026
विविध क्षेत्रातील व्यक्तींना ‘उडाण पुरस्कार’ जाहीर

देशभक्तीपर गीत व नृत्य स्पर्धा तसेच रंगणार ‘महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम


विविध क्षेत्रातील व्यक्तींना ‘उडाण पुरस्कार’ जाहीर


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) संलग्न उडाण फाउंडेशनच्या वतीने भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीत स्पर्धा, नृत्य स्पर्धा तसेच ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ऑगस्ट रोजी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, टिळक रोड, अहिल्यानगर येथे हा सोहळा उत्साहात पार पडणार असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय ‘उडाण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.


महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राही फाउंडेशनच्या संचालिका रूपाली करांडे यांना राज्यस्तरीय उडाण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून 750 महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले असून, त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.


औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सागर ससाणे हे स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड येथे गेली 20 वर्षे कार्यरत असून, ते उच्चविद्याविभूषित आहेत. औद्योगिक सुरक्षा, गुणवत्ता व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन, संशोधन उपक्रम, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, व्याख्याने तसेच कौशल्य विकासाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.


शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या सेंट सेव्हिअर्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य ज्योत्स्ना शिंदे यांनाही राज्यस्तरीय उडाण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत, रक्तदान शिबिरे, अनाथ व विधवा महिलांना सहाय्य, सामाजिक संस्थांना सहकार्य, विद्यालयाचे नूतनीकरण, मतदार जागृती अभियान अशा विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमुळे त्यांची विशेष दखल घेण्यात आली आहे.


युनिटी योगा संस्था शहरात योगाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्यरत असून, विविध ठिकाणी शास्त्रोक्त योग प्रशिक्षण, संतुलित आहाराचे महत्त्व, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी योगवर्ग तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. याच संस्थेचे प्रशिक्षक अरबाज शेख यांनी योगाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळविले असून, त्यांच्या कार्याचा गौरवही राज्यस्तरीय उडाण पुरस्काराने केला जाणार आहे.


साहित्य क्षेत्रात जागतिक विक्रम करणारे, व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट तसेच 106 पुस्तकांचे लेखक प्रा. डॉ. शंकर अंदानी यांच्या ‘लेक लाडकी’ या स्वलिखित पुस्तकालाही राज्यस्तरीय उडाण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
याशिवाय लावणी क्षेत्रातील प्रसिद्ध लावणी साम्राज्ञी रोहिणी थोरात, नाट्य अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रातील अनंत जोशी, अभिनय क्षेत्रातील विद्या जोशी, नृत्य विशारद व सामाजिक जनजागृती करणारे अनंत द्रविड, लेखिक प्रा. च.वी. जोशी, साहित्यिक सुनील राऊत, विमा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विनायक नेवसे, गीत गायन क्षेत्रातील सुनील महाजन व राजेंद्र टाक, नाट्य अभिनय क्षेत्रातील सागर खिस्ती, लोककलावंत राजेश व्यवहारे, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे साधना काकडे,
माहेर संस्थेच्या माध्यमातून महिला समुपदेशन करणाऱ्या रजनी ताठे, अनाथ मुलांचे संगोपन करणारे प्रा. सुनील मतकर तसेच अजय फाउंडेशनच्या माध्यमातून कॅन्सर जनजागृती करणाऱ्या विद्या तन्वर यांनाही राज्यस्तरीय उडाण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.


या पुरस्कार वितरण सोहळ्यास आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले, आमदार डॉ. किरण लहामटे, पुष्पाताई लहाने, ॲड. प्रसाद साळुंके, आंतरराष्ट्रीय खेळाडू व कुस्तीतील सुवर्णपदक विजेत्या कुस्तीपटू डॉ. शबनम शेख, मेहरनाथ कलचुरी, विशेष जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, माय भारतचे सत्यजित संतोष तसेच जय असोसिएशनचे राज्याध्यक्ष ॲड. महेश शिंदे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती उडाण फाउंडेशनच्या अध्यक्षा ॲड. आरती शिंदे व कायदेशीर सल्लागार दिनेश शिंदे यांनी दिली.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय शिंदे, जयश्री शिंदे, ॲड. मनीषा भिंगारदिवे, भीमराव उल्हारे, डॉ. ईसा शेख, ॲड. गायत्री गुंड, ॲड. तुषार शेंडगे, मीनाताई म्हसे, भाऊसाहेब पादीर, अनिल साळवे, राजकुमार चिंतामणी, ॲड. विद्या शिंदे, तुषार रणनवरे, रावसाहेब मगर, स्वाती डोमकावळे, वनिता पाडळे, मंजू रॉय, कविता अभंग, अश्‍विनी वाघ आणि रावसाहेब काळे हे परिश्रम घेत असून, स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *