‘राष्ट्रीय तिरंगा धारणालय’ उत्सवातून लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती आणि संविधानिक नैतिकतेचा होणार जागर
जात, धर्म, पक्ष आणि व्यक्तिपूजेच्या पलीकडे जाऊन या राष्ट्रीय धारणालय परिवर्तन चळवळीत सहभागी व्हा -ॲड. कारभारी गवळी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीयांच्या मनामध्ये शतकानुशतके रुजविण्यात आलेली जन्माधारित विषमता, जातीय श्रेष्ठत्व, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा आणि दैववाद यांना वैचारिक व नैतिक नकार देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने 8 ऑगस्ट 2026 रोजी अहिल्यानगरच्या ऐतिहासिक दिल्ली गेट येथे ‘मनुस्मृती धारणालयाशी राष्ट्रीय घटस्फोट’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
हे आंदोलन माणसामाणसांत जन्माच्या आधारावर भेदभाव निर्माण करणाऱ्या कालबाह्य मानसिक संस्कारांविरुद्ध असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे. भारतीयांच्या धारणालयातून जातीय विषमता, स्त्रीदास्य, मतदास्य, अंधश्रद्धा आणि दैववादाच्या प्रवृत्ती दूर करण्यासाठी देशव्यापी लोकशिक्षण चळवळ उभारण्याचा संकल्प असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याचवेळी ‘राष्ट्रीय तिरंगा धारणालय उत्सव’ साजरा करून भारतीय तिरंग्याला लोकशाही स्वशासनाच्या उन्नत मूल्यांचे जिवंत प्रतीक म्हणून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. तिरंग्यातील केशरी रंग लोकभक्तीचा, पांढरा रंग ज्ञानभक्तीचा, हिरवा रंग कर्मभक्तीचा; तर अशोकचक्र संविधानिक नैतिकता, समता, न्याय आणि कायद्याच्या राज्याचे प्रतीक म्हणून स्वीकारण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
संघटनांच्या मते, प्रत्येक नागरिक, मतदार, लोकप्रतिनिधी आणि लोकसेवकाचे वैयक्तिक धारणालय हेच त्याच्या स्वशासनाचे अंतर्गत संविधान असते. हे धारणालय अपरिवर्तनीय नसून ज्ञान, अनुभव, आत्मपरीक्षण, न्यूरोप्लास्टिक अध्ययन आणि सजग रिकॉन्शिओ शासनाच्या माध्यमातून बदलता व उन्नत करता येते. स्वार्थी, जातीय आणि केंद्राभिमुख मानसिक शासनाच्या जागी लोककल्याण, विज्ञान, विवेक, कार्यक्षमता आणि संविधाननिष्ठतेवर आधारित रिकॉन्शिओ स्वशासन निर्माण झाले, तर भारतीय संसदीय लोकशाही केवळ मतदानाची व्यवस्था न राहता, सतत जागृत आणि लोककल्याणकारी जीवनपद्धती बनेल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात येणार असल्याचे म्हंटले आहे.
“मनुस्मृतीच्या विषमतेशी वैचारिक घटस्फोट; संविधानिक तिरंगा धारणालयाशी आजीवन निष्ठा!” हा या आंदोलनाचा प्रमुख संदेश राहणार आहे. पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी नागरिकांना जात, धर्म, पक्ष आणि व्यक्तिपूजेच्या पलीकडे जाऊन या राष्ट्रीय धारणालय परिवर्तन चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनासाठी अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, वीरबहादूर प्रजापती, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, धनंजय मडके, कैलास पठारे, ॲड. विद्या शिंदे, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, प्रकाश गोसावी यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

