जुनी ‘क्लिक स्पोर्ट्स’ वेबसाईट सुरू ठेवण्याची क्रीडा शिक्षक महासंघाची शासनाकडे मागणी
नवीन पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे शाळा व खेळाडू नोंदणी रखडली, जुने पोर्टल चालू ठेवा -नंदकुमार शितोळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या नियोजनासाठी शासनाने यंदापासून नवीन ऑनलाईन वेबसाईट सुरू केली असली, तरी त्यामधील तांत्रिक अडचणींमुळे संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. ऑगस्ट महिना सुरू होऊनही अनेक शाळांची नोंदणी पूर्ण झालेली नसून, खेळाडू नोंदणीसाठी आवश्यक असलेले प्रायमरी फॉर्म उपलब्ध नसल्याने जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रकच विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जुनी ‘क्लिक स्पोर्ट्स’ वेबसाईट पूर्ववत सुरू ठेवण्याची मागणी अहिल्यानगर जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाने शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळा नोंदणी, खेळाडू नोंदणी, प्रायमरी फॉर्म, विविध अनुदान विषयक माहिती तसेच शासन निर्णय यामध्ये राज्यभर एकसारखेपणा राहावा, या उद्देशाने शासनाने यावर्षी नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. मात्र प्रत्यक्षात या पोर्टलवर शाळांची नोंदणी करतानाच अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार क्रीडा शिक्षकांकडून केली जात आहे.
याशिवाय खेळाडू नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या प्रायमरी फॉर्मची प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची नोंदणीच होऊ शकत नाही. परिणामी शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन रखडले असून, हजारो विद्यार्थी स्पर्धांपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून शालेय क्रीडा स्पर्धांची ऑनलाईन प्रक्रिया ‘क्लिक स्पोर्ट्स’ या संकेतस्थळामार्फत राबविण्यात येत होती. त्याच संकेतस्थळावर खेळाडूंची प्रमाणपत्रे उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना ती कोणत्याही वेळी सहज डाउनलोड करता येत होती. मात्र शासनाने नवीन प्रणाली सुरू केल्यानंतर ‘क्लिक स्पोर्ट्स’सोबतचा करार संपुष्टात आल्याने जुने पोर्टल बंद झाले आहे. त्यामुळे अनेक वर्षांतील स्पर्धा प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे शालेय व महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत, ग्रेस गुण मिळविण्यासाठी, शिष्यवृत्ती, नोकरी तसेच विविध शासकीय प्रस्तावांसाठी खेळाडूंना क्रीडा प्रमाणपत्रांची आवश्यकता भासते. मात्र जुनी प्रमाणपत्रे उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची मोठी गैरसोय होत असल्याचे महासंघाने निवेदनात नमूद केले आहे. नवीन पोर्टलमधील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करून शाळा व खेळाडू नोंदणीची प्रक्रिया सुरळीत करावी. तसेच नवीन प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत जुनी ‘क्लिक स्पोर्ट्स’ वेबसाईट सुरू ठेवून पूर्वीची सर्व प्रमाणपत्रे डाउनलोड करण्याची सुविधा कायम ठेवावी, अशी मागणी अहिल्यानगर जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाने केली आहे.
याबाबतचे निवेदन महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार शितोळे, कार्याध्यक्ष अजित वडवकर, उपाध्यक्ष बापूराव होळकर, सचिव नितीन घोलप तसेच सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, सुनील गागरे, घनश्याम सानप, तुवर पाटील, बापूराव गायकवाड, किरण चौधरी, काकासाहेब चौधरी आणि सुनील मंडलिक यांनी शासनाकडे पाठवले आहे.
–—
ऑगस्ट महिना सुरू झाला आहे, तरी अनेक शाळांची नोंदणी झालेली नाही. खेळाडू नोंदणीसाठी आवश्यक असलेले प्रायमरी फॉर्म उपलब्ध नाहीत. परिणामी शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन ठप्प झाले असून विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे अनेक वर्षांची क्रीडा प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. ही प्रमाणपत्रे ग्रेस गुण, उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती आणि विविध शासकीय प्रक्रियांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. नवीन प्रणाली पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत जुनी ‘क्लिक स्पोर्ट्स’ वेबसाईट सुरू ठेवण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांची जुनी प्रमाणपत्रे सहज उपलब्ध होतील. -नंदकुमार शितोळे (अध्यक्ष, अहिल्यानगर जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ)
–

