• Fri. Aug 7th, 2026

Mirrornews24

Marathi News

भिमाशंकर ज्योतिर्लिंग व ओझर गणपती दर्शनासह हरदिन मॉर्निंग ग्रुपचा पर्यावरण संदेश

ByMirror

Aug 6, 2026
स्वच्छता अभियानासह वृक्षारोपणाचा उपक्रम

स्वच्छता अभियानासह वृक्षारोपणाचा उपक्रम


वृक्षारोपण आणि स्वच्छता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनावी -संजय सपकाळ


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वर्षभर पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक उपक्रमांद्वारे शहरात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सदस्यांसाठी पुणे जिल्ह्यातील पवित्र भिमाशंकर ज्योतिर्लिंग तसेच अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझर येथील श्री विघ्नहर गणपती दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीत धार्मिक पर्यटनाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दोन्ही मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आणि भिमाशंकर परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.


भिमाशंकरच्या निसर्गरम्य वातावरणात सर्व सदस्यांनी भगवान शंकराचे दर्शन घेऊन राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीची तसेच पर्यावरण संतुलित राहण्याची प्रार्थना केली. दर्शनानंतर सदस्यांनी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवत प्लास्टिक व इतर टाकाऊ कचरा गोळा करून स्वच्छतेचा संदेश दिला. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.


यानंतर सदस्यांनी अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीचे भक्तिभावाने दर्शन घेतले. दर्शनानंतर तेथेही मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून भाविकांना स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि निसर्गाचे जतन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


हरदिन मॉर्निंग ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून नियमित वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्यविषयक जनजागृती, सामाजिक सेवा आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवत आहे. या उपक्रमात संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्यासह जहीर सय्यद, सचिन चोपडा, दिलीप गुगळे, दिलीप ठोकळ, सरदारसिंग परदेशी, विकास भिंगारदिवे, अशोक पराते, ताराचंद ठोकळ, विलास आहेर, मनोहर दरवडे, रतन मेहेत्रे, दीपक घोडके, सुधीर कपाळे, अविनाश जाधव, सुभाष पेंढूरकर, इंजि. अनिल सोळसे, प्रकाश देवळालीकर, दीपक घाडगे, अशोक लोंढे, शिरीष पोटे, रामनाथ गर्जे, राजू शेख, अविनाश पोतदार, शेषराव पालवे, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ, सुहास देवराईकर, सखाराम अळकुटे, विठ्ठल निमसे, योगेश चौधरी, राजेश तनपुरे, कुमार धतुरे, शशिकांत पवार, अनिल हळगावकर, मच्छिंद्र बेरड, महादेव ढाकणे, सिद्धू बेरड, राजकुमार मोरे, संतोष चोपडा आदी सदस्य मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.


संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले, “भक्ती आणि सामाजिक कर्तव्य यांचा सुंदर संगम घडविणे ही काळाची गरज आहे. मंदिरात दर्शन घेण्याबरोबरच मंदिर परिसर आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही प्रत्येक भाविकाने स्वीकारली पाहिजे. वृक्षारोपण आणि स्वच्छता ही केवळ एकदिवसीय मोहीम नसून ती आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. हरदिन मॉर्निंग ग्रुप भविष्यातही पर्यावरण संरक्षण, आरोग्य संवर्धन आणि समाजहिताचे विविध उपक्रम सातत्याने राबवत राहील. अधिकाधिक नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन स्वच्छ, हरित आणि निरोगी समाज घडविण्यास हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *