• Tue. Aug 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचा सोहळा साजरा

ByMirror

Aug 17, 2026
शहरात सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीचा सोहळा साजरा

80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त माय भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय, उडाण फाउंडेशनचा उपक्रम


देशभक्तीच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य घडून येते -सत्यजीत संतोष (माय भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी)


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशभक्तीच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक ऐक्य घडून येते. नव्या पिढीला आपल्या जुन्या परंपरा आणि इतिहासाची माहिती मिळते. कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो. समाजात बंधुभाव एकात्मता आणि आपुलकी वाढीस लागत असल्याचे प्रतिपादन माय भारत अहिल्यानगरचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष यांनी केले.
80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वच्छता पखवाडा अंतर्गत माय भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय, उडाण फाउंडेशनच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीवर गीत गायन, नृत्य स्पर्धा आणि महाराष्ट्राची लोकधारा सादरीकरणाचे कार्यक्रम शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात उत्साहात पार पाडले. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय कर्डिले, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, प्रा. डॉ. शंकर अंदानी, जय असोसिएशन ऑफ एनजीओचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, प्रा. डॉ. रमेश वाघमारे, ॲड. अनिता दिघे, शाहीर कान्हू सुंबे, शासनाचा राज्य युवती पुरस्कार विजेत्या जयश्री शिंदे, रजनी ताठे, उडाणच्या अध्यक्षा आरती शिंदे आदी पाहुणे उपस्थित होते.
पुढे सत्यजित संतोष म्हणाले की, मुलांमधील निरागसता जपा. त्यांचे बालपण बहरु द्या. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तुलसीमातेला पाणी अर्पण करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. शंकर अंदानी लिखित लेक लाडकी या पुस्तकाला उडान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, योग ही प्राचीन भारतीय संस्कृती असून, आज जगभराने योगाचा स्वीकार केला आहे. युनिटी योगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष योग प्रात्यक्षिक या सोहळ्यात युवकांनी सादर केले. मानवी जीवनासाठी दररोज योग केला पाहिजे. अहिल्यानगर मधील विविध शाळा, महाविद्यालय, अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीते, नृत्य व महाराष्ट्राची लोकधारा 80 व्या स्वातंत्र दिनी सादर करून स्वतंत्र्याचा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा केल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार अक्षय कर्डिले यांनी उडान फाउंडेशन ही संस्था रतडगाव या छोट्याश्‍या गावातून येऊन जिल्हाभर सामाजिक योगदान देत आहे. ही संस्था सात वर्षापासून महिला, युवक, युवती आणि विद्यार्थ्यांसाठी उल्लेखनीय कार्य करीत आहे. समाजासाठी संस्थेचे कार्य प्रेरणादायी असून, उपस्थितांना त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


स्पर्धेचे परीक्षण नृत्य विशारद अनंत द्रविड व संगीतकार तथा निवेदक राजेंद्र टाक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. अनिता दिघे व ॲड. गायत्री गुंड यांनी केले. प्रास्ताविक उडान फाउंडेशनच्या अध्यक्षा आरती शिंदे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत दिनेश शिंदे यांनी केले. स्पर्धेच्या संयोजनासाठी रजनी ताठे, रोहिणी थोरात, वनिता पाडळे, अक्षय शिंदे, जयेश शिंदे, विद्या शिंदे, हेमलता कांबळे, दिपाली उदमले, मंजू रॉय, तुषार शेंडगे, तुषार रणनवरे, अनिल साळवे, कविता अभंग, धीरज ससाणे, भाऊसाहेब पादीर, ॲड. मनीषा भिंगारदिवे, ईसाभाई शेख, भारती शिंदे, बाळू बनसोडे, शुभम शिंदे, अनुराधा शिंदे, तनिश बनसोडे, हर्षल वामन, छाया शिंदे, दिलीप शिंदे, फरान खान, सार्थक जाधव, ऐश्वर्या बनसोडे, प्रतीक्षा वामन आदींनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *