महाराष्ट्र दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संकल्प
“प्रत्येकाने एक झाड लावा, पर्यावरण वाचवा” -सुनील सकट
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ग्रीन सिटी मोहिमेला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या मोहिमेअंतर्गत बाबावाडी वस्तीगृह येथे वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्राप्त सुनील सकट यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला.
पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून, आमदार संग्राम जगताप व उपमहापौर धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रीन सिटी मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन आणि शहर हरित करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी वृक्षारोपण उपक्रम राबवले जात आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून बाबावाडी वस्तीगृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शहर जिल्हा भाजप सचिव डॉ. संदीप पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष आनंद राठोड (टायरवाले), प्रीतम आहुजा, वस्तीगृहाच्या अधिक्षका सुमनताई कांबळे, अशोक भोसले, संतोष सिरसाठ यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
सुनील सकट म्हणाले की, “आजच्या बदलत्या वातावरणात वाढते प्रदूषण आणि घटत चाललेली हरित क्षेत्रे ही गंभीर चिंता बनली आहे. त्यामुळे ‘ग्रीन सिटी’ ही केवळ मोहिम नसून, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण लावलेले प्रत्येक झाड हे भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरणार आहे. झाडे आपल्याला केवळ प्राणवायूच देत नाहीत, तर पावसाचे प्रमाण, तापमान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य करतात. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. विशेषतः विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्यास ही चळवळ अधिक प्रभावी होईल. ‘एक विद्यार्थी एक झाड’ हा संकल्प राबवून आपण आपल्या शहराला खऱ्या अर्थाने ‘ग्रीन सिटी’ ची वाटचाल शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. झाडे लावणे हीच खरी निसर्गसेवा असून, भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सहभाग नोंदवणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमादरम्यान आनंद राठोड यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांचा उत्साह वाढविला, तर वस्तीगृहाच्या अधिक्षका सुमनताई कांबळे यांनी लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली.
