• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती जाहिरातीस मुदतवाढ द्या

ByMirror

May 13, 2026
कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यतेअभावी भरती प्रक्रिया रखडली

कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यतेअभावी भरती प्रक्रिया रखडली


30 जूनपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा विचार करण्याची शिक्षक परिषदेची मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संच मान्यता कनिष्ठ महाविद्यालयांची उपलब्धता अद्यापही प्रलंबित असल्याने पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीच्या जाहिरातीस मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांच्या नेतृत्वाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी वर्षाताई गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन त्यांच्या मार्फत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहे.


यावेळी शिक्षक परिषदेचे कोषाध्यक्ष बबन शिंदे, सुनिल दानवे, संजय पालवे, अशोक पवार, रावसाहेब गाणखेर, सुरेश सरोटे, मच्छिंद्र ढाकणे, एम. एस. साखरे, ए. पी. क्षीरसागर, जी. एम. शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील संच मान्यतेतील रिक्त पदांच्या आधारे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. मात्र, माध्यमिक विभागाशी संलग्न असलेल्या अनेक कनिष्ठ महाविद्यालयांची संच मान्यता अद्याप प्रलंबित असल्यामुळे संबंधित शाळांमध्ये रोस्टर तपासणी आणि रिक्त शिक्षक पदांची जाहिरात प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. परिणामी भरती प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.


शिक्षक परिषदेने शासनाकडे मागणी करताना स्पष्ट केले की, कनिष्ठ महाविद्यालयांची संच मान्यता उपलब्ध झाल्यानंतरच भरती जाहिरातीची अंतिम मुदत निश्‍चित करण्यात यावी. तसेच राज्यातील बहुसंख्य शिक्षकांची जन्मतारीख 1 जून असल्याने दरवर्षी 30 जून रोजी मोठ्या प्रमाणावर शिक्षक सेवानिवृत्त होतात. त्यामुळे अनेक विद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त राहण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होऊ शकतो.


याच पार्श्‍वभूमीवर शिक्षक परिषदेने शासनाला विनंती केली आहे की, पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी 31 मे 2026 पर्यंत रिक्त होणाऱ्या जागांचा विचार करण्याऐवजी 30 जून 2026 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा आधार घ्यावा. त्यानुसार भरती जाहिरातीस मुदतवाढ देऊन सर्व रिक्त पदांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.



“कनिष्ठ महाविद्यालयांच्या संच मान्यता प्रलंबित असल्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भरती जाहिरातीस मुदतवाढ द्यावी. तसेच 30 जूनपर्यंत रिक्त होणाऱ्या सर्व शिक्षक पदांचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल आणि शाळांमधील शिक्षकांची कमतरता भरून निघेल.” -बाबासाहेब बोडखे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद)

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *