• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

“मतांसाठी आम्ही… आणि रोजगारासाठी कोण?” स्थानिक कचरा वेचकांनी मांडल्या व्यथा

ByMirror

Jul 13, 2026
रामवाडीत रंगली कष्टकऱ्यांची चहावर चर्चा

रामवाडीत रंगली कष्टकऱ्यांची चहावर चर्चा


रोजगाराला प्राधान्य, सुरक्षा, कामाची शाश्‍वती आणि सुविधा पुरविण्याची कचरा वेचकांची मागणी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथे आयोजित “कष्टकऱ्यांची चहावर चर्चा” या बैठकीत महिला व पुरुष कचरा वेचकांची विविध विषयावर चर्चा रंगली होती. यामध्ये शहरातील कचरा वेचक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही चर्चा बेंगळुरूमधील हसरू दला संस्थेच्या सहकार्याने प्रायोगिक तत्त्वावर (पायलट प्रकल्प) आयोजित करण्यात आली होती. यावेळी 20 कचरा वेचकांना सुरक्षा साहित्य (सेफ्टी किट) वितरित करण्यात आले.


या उपक्रमातून कचरा वेचकांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या हक्क, सन्मान आणि रोजगाराच्या प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीत सुभद्राबाई उल्हारे, अलका उल्हारे आणि इतर कचरा वेचकांनी अनेक वर्षांपासून शहराची स्वच्छता राखण्यासाठी योगदान देऊनही रोजगाराची शाश्‍वती, सामाजिक सुरक्षा, ओळखपत्र, गणवेश, सुरक्षा साहित्य आणि सन्मान यांसारख्या मूलभूत सुविधांची आवश्‍यकता अधोरेखित केली.


स्थानिक कचरा वेचकांना रोजगाराच्या संधींमध्ये प्राधान्य मिळावे, जेणेकरून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरक्षित होईल, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. “मतांसाठी आम्ही… आणि रोजगारासाठी कोण?” हा प्रश्‍न उपस्थित करत स्थानिक श्रमिकांना न्याय मिळावा, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
चर्चेदरम्यान बेंगळुरूमधील हसरू दला संस्थेने कचरा वेचकांच्या संघटन, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी राबविलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. पायलट प्रकल्पांतर्गत वितरित करण्यात आलेल्या 20 सेफ्टी किटचा अनुभव सकारात्मक असून, भविष्यात अशा सुविधा अधिकाधिक कचरा वेचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


यावेळी स्थानिक कचरा वेचकांना रोजगारात प्राधान्य, ओळखपत्र, गणवेश, सुरक्षा साहित्य, आरोग्य विमा, सामाजिक सुरक्षा योजना आणि नियमित उपजीविकेची हमी यासाठी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीच्या शेवटी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत यांच्या नेतृत्वाखाली कचरा वेचकांना अधिक संघटित करून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने पुढील भूमिका निश्‍चित करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे यांनी माहिती दिली.


“आम्ही केवळ मतदार नाही; आम्ही शहर स्वच्छ ठेवणारे श्रमिक आहोत. आमच्या श्रमाचा सन्मान, आमच्या हक्कांचे संरक्षण आणि स्थानिक कचरा वेचकांना रोजगारात योग्य प्राधान्य मिळावे,” अशी भावना उपस्थित कचरा वेचकांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *