क्रिकेट बेटिंग, ऑनलाइन रमी, कॅसिनो ॲप्सच्या वाढत्या विळख्यावर चिंता; गृहमंत्री व पोलीस महासंचालकांकडे निवेदन
युवकांचे भविष्य धोक्यात; एजंट आणि सूत्रधारांवर कठोर कारवाईसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचीचा पुढाकार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बेकायदेशीर ऑनलाइन जुगाराच्या (ऑनलाइन क्रिकेट बेटिंग, बिंगो, ऑनलाइन रमी, कॅसिनो आणि तत्सम जुगार ॲप्स) वाढत्या जाळ्यावर तातडीने कठोर कारवार्इ करण्याची मागणीचे निवेदन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक यांना पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे युवकांचे भविष्य धोक्यात येत असून अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडत असल्याची गंभीर बाब समितीने निदर्शनास आणून दिली आहे.
समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्ह्यात ऑनलाइन क्रिकेट बेटिंग, बिंगो, ऑनलाइन रमी, कॅसिनो तसेच विविध बेकायदेशीर जुगार ॲप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार सुरू आहेत. या माध्यमातून लाखो रुपयांची बेकायदेशीर उलाढाल होत असल्याची चर्चा असून अनेक युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक सहज पैसे कमावण्याच्या मोहापायी या जुगाराच्या विळख्यात अडकत आहेत.
या ऑनलाइन जुगारामुळे अनेक युवक कर्जबाजारी होत असून खासगी सावकारांच्या तगाद्याला सामोरे जावे लागत आहे. आर्थिक नुकसान, कौटुंबिक कलह, मानसिक तणाव आणि नैराश्य यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. राज्यातील विविध भागांत आर्थिक तणावातून आत्महत्यांच्या घटना समोर येत असल्याचा उल्लेख करून अहिल्यानगर जिल्ह्यातही अशी परिस्थिती उद्भवण्यापूर्वी प्रतिबंधात्मक आणि कठोर उपाययोजना करण्याची गरज समितीने व्यक्त केली आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाची चौकशी करताना महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 तसेच प्रकरणानुसार लागू होऊ शकणाऱ्या भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित इतर कायद्यांतील तरतुदींचा वापर करून संबंधितांविरुद्ध कठोर गुन्हे नोंदविण्यात यावेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व बेकायदेशीर ऑनलाइन जुगार ॲप्स, वेबसाइट्स, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप गट तसेच एजंट्सवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. या व्यवसायाशी संबंधित बँक खाती, UPI आयडी, डिजिटल वॉलेट्स आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून आवश्यकतेनुसार ती गोठविण्याची कार्यवाही करण्यात यावी. संपूर्ण रॅकेटमागील मुख्य सूत्रधार, एजंट, आर्थिक लाभार्थी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्यात यावी. सायबर पोलीस, स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेचे संयुक्त विशेष पथक स्थापन करून सातत्याने शोधमोहीम व कारवाई राबविण्यात यावी. युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाइन जुगाराच्या दुष्परिणामांविषयी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. या प्रकरणातील कारवाईचा नियमित सार्वजनिक अहवाल प्रसिद्ध करून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
ऑनलाइन जुगाराचा वाढता विळखा हा केवळ आर्थिक गुन्ह्यांचा विषय नसून तो युवकांचे भविष्य, कुटुंबांचे आर्थिक स्थैर्य आणि समाजातील कायदा व सुव्यवस्था यांच्याशी थेट संबंधित आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची शासनाने तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

