उद्योजकांच्या प्रत्येक प्रश्नावर तातडीने कारवाई होईल -डॉ. पंकजा आशिया ( जिल्हाधिकारी)
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आमी संघटनेच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी डॉ. पंकजा आशिया यांच्या उपस्थितीत उद्योजक संवाद बैठक पार पडली. या बैठकीत एमआयडीसी परिसरातील कचरा व्यवस्थापन, वीजपुरवठा, ईएसआयसी रुग्णालय उभारणी, पाणीपुरवठा, औद्योगिक सुविधा तसेच विविध प्रलंबित प्रशासकीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उद्योजकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीच्या प्रारंभी आमी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बैठक केवळ औपचारिक नसून उद्योग क्षेत्र आणि प्रशासन यांच्यात थेट संवाद घडवून आणण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी एमआयडीसीतील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यामुळे कामगारांच्या आरोग्यावर परिणाम होत.असल्याचे निदर्शनास आणून दिले. काही ठिकाणी कचरा साचणे, सांडपाणी तुंबणे आणि दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच एमआयडीसीमध्ये ईएसआयसी रुग्णालय उभारणीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून हजारो कामगारांच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी प्रशासनाच्या सहकार्यामुळे एमआयडीसीतील रस्ते, पथदिवे आदी काही प्रश्न मार्गी लागल्याबद्दल समाधान व्यक्त करत उर्वरित प्रश्नांवरही तितक्याच वेगाने निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. बैठकीत उद्योजकांनी नवीन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सीएनजी गॅस मीटरची कमतरता, तसेच भविष्यात अपुरा पडणारा वीजपुरवठा तसेच पाणीपुरवठ्याच्या अडचणी मांडल्या. अनेक उद्योग सुरू होण्यास तयार असून मूलभूत सुविधांच्या अभावामुळे गुंतवणूकदारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर उत्तर देताना जिल्हाधिकारी डॉ. पंकजा आशिया म्हणाले उद्योग क्षेत्राच्या अडचणी प्राधान्याने सोडविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. उद्योजकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधून तातडीने निर्णय घेतले जातील. कोणताही प्रश्न केवळ कागदावर राहणार नाही, तर त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही होईल.
ते पुढे म्हणाले की, नवीन सबस्टेशन उभारण्यास काही कालावधी लागणार असला तरी आहेत त्या सबस्टेशनमध्ये अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवून वीज क्षमतेत वाढ करण्याचा प्रस्ताव तातडीने पुढे नेण्यात येईल. सीएनजी गॅस मीटर उपलब्धतेबाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून लवकरात लवकर मार्ग काढला जाईल.कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर त्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देत, ज्या ठिकाणी कचरा साचला आहे किंवा सांडपाणी तुंबले आहे त्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित विभागांना तातडीने स्वच्छता मोहीम राबविणे, कायमस्वरूपी उपाययोजना करणे आणि जबाबदार यंत्रणांवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
ईएसआयसी रुग्णालयाच्या प्रश्नाबाबतही त्यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांशी पाठपुरावा करून हा विषय शासन स्तरावर प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन दिले. बैठकीच्या शेवटी डॉ. पंकजा आशिया यांनी प्रशासन आणि उद्योग क्षेत्र यांच्यात सातत्याने संवाद राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. उद्योग वाढले तर रोजगार वाढेल आणि जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. त्यामुळे उद्योजकांच्या रास्त मागण्यांवर प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रवीण जुंद्रे, सतीश गवळी, सागर निंबाळकर, सुमित सोनवणे, प्रकाश गांधी, सचिन पाठक, अमोल घोलप, गणेश कोलार, संजय बंदिष्टी, अनिल लोढा, मिलिंद कुलकर्णी, पुरुषोत्तम नावंदर, संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

