• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे शिक्षक सेनेकडून स्वागत; शिक्षकांच्या प्रश्‍नांवर चर्चा

ByMirror

May 13, 2026
शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी शासन-शिक्षक संवाद गरजेचा -प्रसाद शिंदे

अहिल्यानगर दौऱ्यात शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले; शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिकेचे आश्‍वासन


शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी शासन-शिक्षक संवाद गरजेचा -प्रसाद शिंदे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे हे अहिल्यानगर दौऱ्यावर आले असता शिक्षक सेनेच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी श्रीराम खाडे, ललित वकचौरे, राजेंद्र सोनवने आदी मान्यवर उपस्थित होते.


या भेटीदरम्यान शिक्षण क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांपासून शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेपर्यंत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींसह विद्यार्थ्यांच्या हिताच्या अनेक विषयांकडे शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेत शिक्षकांना येणाऱ्या प्रशासकीय अडचणी, शाळांमधील मूलभूत सुविधांची गरज, ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रश्‍न आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्‍यक उपाययोजना यावरही चर्चा झाली.


शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी शिक्षकांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्या सोडविण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.


यावेळी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्‍नांबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित बाबींवर लक्ष देण्याचे आश्‍वासन दिले. शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या समस्या समजून घेत त्यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठी शासन पातळीवर आवश्‍यक प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी शासन आणि शिक्षक संघटनांमध्ये सातत्यपूर्ण व सकारात्मक संवाद होणे आवश्‍यक असल्याची भावना प्रसाद शिंदे यांनी व्यक्त केली. शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण व्यवस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समन्वयातून काम होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *