• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

शिवजयंतीनिमीत्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप

ByMirror

Mar 8, 2026
शिवजयंतीनिमीत्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्याचे वाटप

शिवाजी महाराजांचे आदर्श जीवन, धैर्य, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा -साधना कुकडे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा बोर्डे, केशवराव हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल गायकवाड, उपक्रमशील शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या साधना कुकडे, मनीषा चौरे, कांचन मिरपगार, जयश्री लांडे, मनीषा हिवाळे आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.


या प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या साधना कुकडे यांच्या पुढाकारातून प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. परीक्षेसाठी शैक्षणिक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.


मुख्याध्यापिका मनीषा बोर्डे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या संकल्पनेतून आजच्या पिढीने प्रेरणा घेणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी शिवरायांचे आदर्श समोर ठेवून प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन समाजासाठी कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.
सामाजिक कार्यकर्त्या साधना कुकडे म्हणाल्या की, शिवाजी महाराजांनी न्याय, स्वाभिमान आणि स्वराज्य यांचे महान विचार समाजाला दिले. त्यांच्या कार्यातून समाजसेवेची प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्‍यक साहित्य देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांचे आदर्श जीवन, धैर्य, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम यांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले.


उपस्थित शिक्षकांनीही शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना त्यांच्या पराक्रमाची व स्वराज्य स्थापनेच्या इतिहासाची माहिती दिली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जयघोषाने वातावरण भारावून टाकले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *