• Sun. Aug 9th, 2026

Mirrornews24

Marathi News

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले रविवारी अहिल्यानगर दौऱ्यावर

ByMirror

Aug 9, 2026
उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न; रिपब्लिकन पक्षाचा निषेध

कै. अशोक गायकवाड यांच्या शोकसभेला ना. आठवले यांची उपस्थिती


शोकसभा, समाजकल्याण विभागाची बैठक अन्‌ पत्रकार परिषद


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्रीय राज्यमंत्री तथा सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री ना. रामदास आठवले हे रविवारी (दि. 9 ऑगस्ट) अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, शहरातील वृंदावन लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी कै. अशोक गायकवाड यांच्या शोकसभेस ते प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. दुपारी 1.45 वाजता ना. आठवले शोकसभेच्या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिली.


कै. अशोक गायकवाड हे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत पदाधिकारी म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात काम केले होते. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत तसेच सामाजिक चळवळीमध्ये त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे साळवे यांनी सांगितले. त्यांच्या निधनाने रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली असून, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी या शोकसभेस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहून कै. अशोक गायकवाड यांच्या सामाजिक व राजकीय कार्याला आदरांजली अर्पण करणार आहेत. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना शोकसभेस उपस्थित राहण्याचे आवाहन साळवे यांनी केले आहे.


ना. रामदास आठवले हे सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून अहिल्यानगरकडे रवाना होतील. त्यानंतर शहरातील वृंदावन लॉन्स येथे आयोजित कै. अशोक गायकवाड यांच्या शोकसभेस ते दुपारी 1.45 वाजता उपस्थित राहणार आहेत.


शोकसभा संपल्यानंतर दुपारी 2.30 वाजता ना. आठवले हे अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत सामाजिक न्याय व समाजकल्याण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला जाणार आहे. यानंतर सायंकाळी 4.15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे ना. रामदास आठवले यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत ते राज्यातील विविध सामाजिक, राजकीय तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाशी संबंधित विषयांवर माध्यमांशी संवाद साधणार आहे. दौरा पूर्ण करून सायंकाळी 5.45 वाजता ना. आठवले हे शासकीय विश्रामगृह येथून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *