• Fri. Jul 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

गुरुपौर्णिमेनिमित्त नवनाथ विद्यालयात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ByMirror

Jul 31, 2026
निमगाव वाघात हरित भविष्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन

निमगाव वाघात हरित भविष्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन


वृक्ष लागवड हीच भावी पिढीसाठी खरी गुरुदक्षिणा -सुमन कुरेल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणे, वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे आणि हरित भविष्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
नवनाथ विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव सुमन कुरेल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, आप्पासाहेब कदम, तेजस केदारी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


सुमन कुरेल म्हणाल्या की, “गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी वृक्षारोपण करून निसर्गाप्रती आपली जबाबदारी पार पाडणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. पर्यावरणाचे संरक्षण केल्याशिवाय भावी पिढीचे सुरक्षित भविष्य घडू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, “वृक्ष हेच जीवनाचे खरे आधार आहेत. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि कमी होत जाणारी हरित संपदा लक्षात घेता वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनालाही तितकेच महत्त्व द्यावे लागेल. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेमाची भावना रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्‍यकता असून, प्रत्येकाने लावलेले झाड जगविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.”
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना परिसर हिरवागार करण्यासाठी नियमित वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *