• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघा येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

ByMirror

Jul 8, 2024
निमगाव वाघा येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान

वारकऱ्यांना वृक्षरोपणासाठी रोप देऊन केली दिंडी मार्गस्थ

गावात ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष व टाळ मृदंगाचा गजर

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ पायी दिंडीचे ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजरात श्री क्षेत्र पंढरपूरकडे नुकतेच प्रस्थान झाले. गावात भक्तीमय वातावरणात डोळे दिपवून टाकणारा रिंगण सोहळा पार पडला. या दिंडीत कल्याणच्या भाविकांसह गावाच्या पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. दिंडीतील भव्य रथाचे गावात जागोजागी स्वागत करुन भाविकांनी पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.


गावाच्या वेशीबाहेर दिंडी पडताना स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने वीणेकरी ह.भ.प. राम महाराज जाधव, ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर, कल्याणचे ह.भ.प. धुंडा महाराज म्हसकर, पायी दिंडी सोहळा ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ डोंगरे व सचिव लक्ष्मण चौरे यांचा संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत रोप देऊन सत्कार केला. वारीला जाताना मुक्काम स्थळी शेतीच्या बांधावर वृक्षरोपण करुन त्या शेतकऱ्यांकडे रोपाच्या संगोपणाची जबाबदारी सोपविण्याचे डोंगरे यांनी स्पष्ट केले.


रथासमोर उद्योजक राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते नारळ वाढवून दिंडीचे प्रस्थान झाले. शिंदे यांनी दिंडीसाठी 11 हजार रुपयाची देणगी देऊन दिंडीसाठी पंढरपूरला 5 गुंठे जागा देण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी माजी सरपंच साहेबराव बोडखे, सरपंच लता फलके, उद्योजक अरुण फलके, कचरु कापसे, गोकुळ जाधव, भागचंद जाधव, नामदेव फलके, भरत बोडखे, भाऊसाहेब जाधव, गोरख फलके, सुनिल जाधव, गुलाब जाधव, चंदू जाधव, बन्सी जाधव, सुभाष कदम, अरुण कापसे, गुलाब कापसे, संजय पुंड, नितीन चारुडे आदींसह ग्रामस्थ, महिला वर्ग व भजनी मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रारंभी किर्तनकार ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज ढोकणे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या दिंडी प्रस्थान कार्यक्रमात निमगाव वाघा आरोग्य केंद्राचे मनोहर गायकवाड, दिपाली कदम व किशोर काळे यांनी वारकऱ्यांसाठी औषधी किटची भेट दिली.
दिंडीमध्ये सुमारे अडीचशे महिला, पुरुष भाविक सहभागी झाले आहेत. दिंडीच्या अग्रभागी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करणारे झेंडेकरी, पांढऱ्या पोशाखात सहभागी भाविक, भजनी मंडळी, फुलांनी सजवलेले रथ व डोक्यावर तुळशी, कळस घेतलेल्या महिला वारीसाठी निघाल्या आहेत. श्री नवनाथ पायी दिंडी केडगाव, अरणगाव, वाळकी, रुईछत्तीसी मार्गे पंढरपुरला जाणार आहे. दिंडीत दररोज हरिपाठ, भारुड, किर्तन व प्रवचनांच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *