शनिवारी राजमाता जिजाऊ दिवाळी पाडवा साजरा करुन लोकशाही बुक संकल्पना राबविणार
जनहिताच्या योजना व आधुनिक संकल्पनाची केली जाणार नोंद
नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने या पुढील दिवाळी लोकशाही दिवाळी म्हणून साजरी करण्यात येणार आहे. शनिवारी (दि.2 नोव्हेंबर) राजमाता जिजाऊ दिवाळी पाडवा नगरच्या हुतात्मा स्मारकात सकाळी 11 वाजता साजरा करण्यात येणार आहे. लोकशाही दिवाळी कार्यक्रमाचा भाग म्हणून लोकशाही बुक ही संकल्पना राबवून जनहिताच्या योजना व आधुनिक संकल्पनाची नोंद या लोकशाही बुकात केली जाणार आहे. तर इडा पिडा डिच्चू कावा! बळीचे राज्य लोकफत्ते! ही घोषणा जारी केली जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
लोककल्याणासाठी नेहमीच पुढाकार घेतलेले देशाचे दिवंगत उद्योजक स्व. रतन टाटा यांच्या सन्मानार्थ जनतेच्या सेवेत लोकशाही बुक लोकार्पण केले जाणार आहे. लोकशाही बुक हे अतिशय आधुनिक आणि वेगळी संकल्पना आहे. देशभरामध्ये आमदार खासदारांच्या स्वरूपात लोकप्रतिनिधी निवडले जातात. परंतु त्यांच्याकडे लोकभक्ती, ज्ञानभक्ती व कर्मभक्तीचा अभाव आढळून येतो. गेली 9 वर्षे मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनने लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजना राबविण्याचा आग्रह धरला आहे. त्यातून शहराच्या चार-पाच किलोमीटर अंतरावर स्वस्त घरे बांधली जाऊ शकतात. परंतु केंद्र आणि राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये या मागणीचा अवलंब केला नाही, त्यामुळे नगर शहरामध्ये 20 हजार घरकुल वंचितांची यादी बनविली गेली. परंतु एकाला देखील घर मिळाले नाही. विशेष गोष्ट म्हणजे आमदार, खासदारांनी घरकुल वंचितांच्या प्रश्नांबद्दल काही एक आग्रही भूमिका घेतली नाही. त्यातून झोपडपट्ट्या वाढल्या आणि स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर सुद्धा घर निवाऱ्याचा मूलभूत अधिकार घरकुल वंचितांना मिळालेला नाही. त्यामुळे या लोकशाही बुकात लॅण्ड व्हॅल्यू योजना आणि देशातील शहरी घरकुल वंचितांचा प्रश्नाची नोंद केली जाणार आहे.
ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न निकालात काढण्यासाठी शहरी भागात सिमेंटच्या जंगलांचा विस्तार थांबवण्यासाठी संघटनेने रेन गेन बॅटरी आणि ग्रीन गेन बॅटरी तंत्रज्ञानाचा आग्रह धरला. परंतु सरकारकडून किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. या तंत्रामुळे महाराष्ट्रातील 40 टक्के कायमच्या जिरायतदार शेतकऱ्यांसाठी हंगामी बागायतदार होण्याची संधी मिळणार आहे. या तंत्राची नोंद लोकशाही बुकात होणार आहे. भारतातील धर्म दूराभिमान आणि शेकडो जातीमध्ये विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून एकात्मिक ज्ञान सिद्धांताची नोंद या लोकशाही बुकात करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकशाही बुकात यापुढे कोणालाही जनकल्याणासाठी आपला सिद्ध झालेला सिद्धांत प्रयोग जनतेसमोर मांडता येणार आहे. त्यातून अनेक तंत्रांचा वापर तमाम जनतेसमोर होऊ शकणार आहे. एकंदरीत मानव जातीचा भौतिक आणि अध्यात्मिक विकास यापूर्वीपेक्षा जास्त पटीने होऊ शकेल, त्याच वेळेला सजीव सृष्टी व पर्यावरणाचे प्रश्न देखील सुटू शकणार असल्याची भूमिका विशद करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, वीर बहादूर प्रजापती, कैलास पठारे, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.