पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार
मतदारांवर अक्कलमारीचा प्रयोग करणाऱ्यांना निरोपाचे नारळ देण्यासाठी लोकजागृती सुरु
नगर (प्रतिनिधी)- देशासाठी घातक असलेल्या लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांना राजमाता जिजाऊ पाडव्याचे औचित्य साधून शनिवारी (दि.2 नोव्हेंबर) शहरातील हुतात्मा स्मारकात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे कार्यकर्ते कानफाडू शेणलाडू मारणार आहेत. तर मतदारांवर अक्कलमारीचा प्रयोग करणाऱ्या सर्व बेगडी आणि बाजारबुनग्या उमेदवारांना पाच वर्षांसाठी नगरसह संपूर्ण राज्यात निरोपाचे नारळ या निवडणुकीत देण्यासाठी लोकजागृती सुरु असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली.
गेल्या आठ-नऊ वर्षात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेसाठी टोकाच्या भूमिकेतून लोकांचे आणि विशेषत: मतदारांची घाऊक सत्तामारी करणाऱ्यांविरुद्ध प्रातिनिधिक स्वरूपात कानफाडू शेणलाडू मारले जाणार आहे. केंद्रामध्ये तिसऱ्या सत्ता घटकाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी देशातील लोकांनी अधिक मुलांना जन्म द्यावा अशी भूमिका जाहीर रितीने व्यक्त केली. देशभरातील कोट्यावधी घरकुल वंचितांना निवाऱ्याची सोय करण्याऐवजी झोपडपट्टया गुन्हेगारी आणि ऐतखाऊंची फौज निर्माण होण्याची भीती असताना लोकसंख्या वाढीला प्रोत्साहन देणे ही बाब संपूर्ण देशाला घातक आहे. याचा निषेध म्हणून दिवाळीचे फटाके वाजवण्याचा भाग म्हणून चंद्रबाबूंच्या प्रतिमेच्या कानावर कानफाडू शेणेलाडू मारले जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा मागच्या दाराने मिळवण्यासाठी लोकांची आणि मतदारांची अक्कलमारी सुरू आहे. ताबामारी, टक्केवारी, फ्लेक्स दारोदारी यातून मिळणाऱ्या मोठ्या काळ्या पैशाचा वापर मतकोंबड, पोटगी पत्रकार आणि पोटगी सरदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मत मिळवण्यासाठी संपूर्ण राज्यात अक्कलमारी सुरू आहे. रांगोळ्या, फुगड्या, मेहंदी ज्येष्ठांसाठी वाद्य-वृंदाचे कार्यक्रम देखील सुरू आहेत. यातून मतदारांची मोठ्या जाळ्यातून म्हणजे अक्कलमारी करून काळ्या पैशातून मागच्या दाराने सत्ता मिळवण्याचा राजमार्ग दिल्लीपासून गल्लीपर्यंत सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या चार दोन महिने अगोदर रस्त्याची कामे दाखवून क्रांती करत आहेत, असे भासविणे आणि समाजातील विविध घटकातील पोटगी सरदारांना पुढे आणून स्तुती करून घ्यायची आणि क्रांतीचा नायक दाखवून अक्कलमारी चालू ठेवण्याचा प्रकार सुरु आहे. संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांचा डिच्चू कावा तंत्राचा वापर अशा सत्तापेंढारी विरोधात राज्यभर व्यापक केला आहे. त्यामुळे मतदारांवर अक्कलमारीचा प्रयोग करणाऱ्यांना या निवडणुकीत घरचा रस्ता दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी ही मोहिम हातात घेतली आहे. या मोहिमेसाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीर बहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, जयेष देवळालीकर, डॉ. महेबूब शेख, रईस शेख, केशव बरकते, जसवंतसिंग परदेशी, बबलू खोसला, अशोक भोसले, राम धोत्रे, अशोक औशीकर, कैलास पठारे, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम, प्रशांत शिंदे, पोपटराव साठे, सुरेश पापडेजा, अल्ताफ शेख, एम.ए. इकबाल, सुनील टाक आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.