• Mon. May 4th, 2026

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील ‘समन्वय समिती सहविचार सभा व वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात

ByMirror

May 3, 2026

शिक्षणात गुणवत्ता हाच प्रगतीचा खरा पाया -आशुतोष काळे

गुणवंत शाखा, शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “शिक्षणात गुणवत्ता हाच प्रगतीचा खरा पाया आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्तेच्या बाबतीत आपला वेगळा ठसा उमटवला असून हे यश प्राचार्य शाखाप्रमुख गुणवंत शिक्षक आणि रयत सेवकांच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे म्हणून गुणवंतांचा सन्मान म्हणजे गुणवत्तेचा व उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान असल्याचे प्रतिपादन उत्तर विभागाचे विभागीय चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्यावतीने आयोजित ‘समन्वय समिती सहविचार व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ प्रसंगी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.खासदार शरद पवार यांचे विचार काळाच्या पुढे असतात व त्यामुळेच संस्था डिजिटल झाली आहे. मा. चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन ॲड.भगीरथ काका आणि विभागीय मॅनेजिंग कौन्सिल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर विभाग गेली पाच सहा वर्षे भौतिक सुविधा व गुणवत्तेत प्रथम स्थानी आहे आणि हीच परंपरा आपण यापुढेपण सातत्याने पुढे घेऊन जाणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


बैठकीपूर्वी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माउली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेवर पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे आणि सहायक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी यांनी केले. प्रास्ताविकात नवनाथ बोडखे यांनी शैक्षणिक भौतिक व मूलभूत सुविधांची तपशीलवार मांडणी केली. ते म्हणाले की, गुणवता हा एकमेव आजच्या स्पर्धेचा मापदंड समोर ठेवून विभाग चेअरमन व विभागीय व्यवस्थापन कमिटीच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करीत आहे. गुणवत्तेमुळेच विद्यार्थी संख्या वाढत आहे. शिक्षकांची पदे रिक्त असतानाही शैक्षणिक कामकाजाचा अतिरिक्त भार शाखाप्रमुख व शिक्षक शिक्षिका सहन करीत आहेत. विभागातील प्रत्येक वर्ग खोलीमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड बसवण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली.


या बैठकीपूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या मीनाताई जगधने यांना श्रीरामपूर शहर भीमोत्सव समितीतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ॲड.भगीरथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ॲड.भगीरथ (काका)शिंदे म्हणाले की,“जेव्हा गुणवत्ता बोलू लागते, तेव्हा प्रगतीचे नवे मार्ग प्रशस्त होतात. उत्तर विभागाचा हा सन्मान सोहळा विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल गुणवत्ता कक्षाचे काटेकोर नियोजन व पाठपुरावा यामुळेच हे यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर विभागातील ज्या शाखांनी शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली आहे अशा गुणवंत शाखांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी शिक्षक यांचा गुणगौरव करण्यात आला. प्रसंगी विभागीय गुणवत्ता कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर यांच्यासह व गुणवंत शिक्षकांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.


या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, जनरल बॉडी सदस्य, बाबासाहेब भोस, कुंडलिकराव दरेकर, ज्ञानदेव पांडुळे, इंजिनिअर अनिल साळुंखे, प्रा.ए.टी. पोकळे, संदीप वर्षे, मा. सचिव शिवाजी भोर, पद्माकांत कुदळे, मोहन काकड, अण्णासाहेब शेलार, कारभारी आगवान, मनोज कवडे, सुरेश बोळीज उपस्थित होते. यावेळी विभागातील शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, समन्वय समितीचे सदस्य लाईफ मेंबर्स व लाईफ मेंबर्स पालक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीर साबळे आणि मंजूश्री धीवर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *