कोतवाली पोलिसांची तात्काळ कारवाई; 20 तोळे सोने जप्त
आरोपी महिलेकडून गुन्ह्याची कबुली; त्या सराफाला आरोपी करण्यासाठी फिर्यादी महिलेचा उपोषणाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बस प्रवासादरम्यान चोरी गेलेल्या तब्बल 20 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा गुन्हा उघडकीस आणत कोतवाली पोलिसांनी तात्काळ व प्रभावी कारवाई करत चोरीचा तपास पूर्ण केला. 20 तोळे सुमारे 25 लाखाचे सोने जप्त करण्यात यश मिळवले. या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत असतानाच, चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफावर देखील कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील करजगाव येथील मिनाबाई ज्ञानदेव बडाख यांच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनानुसार, मिनाबाई बडाख 7 एप्रिल 2026 रोजी त्या पुणेपाथर्डी एसटी बसने अहिल्यानगरकडे प्रवास करत होत्या. रांजणगाव (जि. पुणे) येथे दोन अनोळखी महिला बसमध्ये चढल्या. त्यापैकी एक महिला त्यांच्या शेजारी येऊन बसली. काही वेळाने झोप लागल्यानंतर त्या महिलांनी संधी साधून बडाख यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरून नेले.
अहिल्यानगर बसस्थानकावर उतरल्यावर हा प्रकार लक्षात येताच बडाख यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्परतेने तपास करत माया कल्याण भोसले (रा. हादगाव, ता. शेवगाव) हिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली देत चोरीचे सोने बोधेगाव येथील सराफ व्यावसायिक भागवत मधुकर आदापुरे याला विकल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी संबंधित सराफाकडून चोरीचे सर्व सोने एका तासात जप्त केले. त्यामुळे पीडित महिलेला दिलासा मिळाला आहे. मात्र, या प्रकरणात चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफावर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सदरचे चोरी गेलेले सोने हे सराफ दुकानदार भागवत मधुकर आदापुरे यांच्याकडून जप्त केलेले आहे. असे असतांनाही संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांनी केवळ माया कल्याण भोसले हिलाच सदर गुन्हयामध्ये आरोपी केलेले आहे. सदर भागवत मधुकर आदापुरे हा अदयापही मोकाट फिरत आहे. वास्तविक पहाता भागवत मधुकर आदापुरे यास देखील सदर गुन्हयाचा सखोल तपास होण्याकामी सदर गुन्हयामध्ये आरोपी करणे न्यायाचे दृष्टीने अत्यंत गरजेचे व आवश्यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
भागवत मधुकर आदापुरे रा. बोधेगांव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर यास सदर गुन्हयात आरोपीपणात त्वरीत सामिल करण्यांत यावे, अन्यथा कुटुंबीयास पोलीस अधीक्षक कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा बडाख यांनी दिला आहे.
सराफ सुवर्णकार समितीचा हस्तक्षेप.
जिल्ह्यातील नागरिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात लुटणाऱ्या टोळीकडून जिल्ह्यातील एका सोनाराने सोने विकत घेतले. त्यांच्याकडे याबाबत तपास करत असताना सराफ सुवर्णकार समितीचे उमेश बुऱ्हाडे( बारामती जि.पुणे), प्रथमेश नगरकर (पुणे) व शशिकांत दीक्षित (सातारा) यांनी विविध मागणी तपास कामात अडथळा निर्माण केला, तसेच गुन्ह्यातील सोनारांची दिशाभूल करून त्यांच्यावर दबाव टाकून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हस्तगत होऊ नयेत म्हणून प्रयत्न करत चोरीचे सोने घेणाऱ्यांना अभय देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यामुळे चोरी झालेले दागिने हस्तगत करण्यात अडथळा निर्माण झाला होता; परंतु तपास पथकाने कौशल्याने तपास करून दागिने हस्तगत केले. मात्र सराफ सुवर्णकार समितीचे तपास करणाऱ्या पोलिसांविरुद्ध उपोषण सुरू केलेले आहे.
