• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

डीजे संस्कृतीवर न्यायालयाचे ताशेरे; शहरात “ज्ञानगुढी”तून वैचारिक क्रांतीचा उद्घोष

ByMirror

May 18, 2026
बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित बौद्धिक चळवळीची दिल्लीगेटला उभारण्यात आली गुढी

बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित बौद्धिक चळवळीची दिल्लीगेटला उभारण्यात आली गुढी


ध्वनीप्रदूषण, दिखाऊ शक्तिप्रदर्शनाविरोधात पीपल्स हेल्पलाईनचा एल्गार; “मोठा आवाज नव्हे, मोठा विचार महत्त्वाचा” :

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जयंती-उत्सवाच्या नावाखाली वाढत चाललेल्या कर्णकर्कश डीजे संस्कृती, ध्वनीप्रदूषण आणि दिखाऊ शक्तिप्रदर्शनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर निरीक्षण नोंदवत समाजासमोर महत्त्वपूर्ण प्रश्‍न उपस्थित केला आहे. न्यायालयाच्या या निरीक्षणाचे पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने स्वागत करण्यात आले असून, त्याला “राष्ट्रीय सलामी” देण्यात आली आहे.


याच पार्श्‍वभूमीवर दिल्लीगेट वेस येथे रविवारी (दि. 17 मे) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित “ज्ञानगुढी” उभारून वैचारिक, बौद्धिक आणि संविधानिक चळवळीचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाद्वारे डीजे संस्कृती, ध्वनीप्रदूषण, अंधानुकरण, मानसिक गुलामगिरी आणि दिखाऊ राजकारणाला विरोध नोंदवण्यात आला. आज अनेक ठिकाणी जयंती उत्सव हा डीजे, फटाके, वाहतूक कोंडी, रस्ते बंद आणि सोशल मीडिया प्रसिद्धीपुरता मर्यादित होत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त करण्यात आली. “समाजाला दिशा देणारे विचार मागे पडत आहेत आणि दिखाऊपणाला अधिक महत्त्व दिले जात आहे, ही चिंतेची बाब आहे,” असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.


यावेळी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, बाळासाहेब पालवे, प्रकाश थोरात, वीरबहादुर प्रजापती, ॲड. अमित थोरात, अशोक भोसले, पोपट भोसले, शिवाजी बलोटे, विजय शिरसाठ, राम धोत्रे, प्रकाश गोसावी, शाहीर कान्हू सुंबे, प्रतीक म्हस्के यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील मा. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके आणि मा. न्यायमूर्ती निवेदिता पी. मेहेता यांनी आपल्या निरीक्षणात स्पष्टपणे नमूद केले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्धिक विकास आणि वंचितांचे उत्थान अधिक प्रिय असते.” न्यायालयाचे हे निरीक्षण केवळ कायदेशीर टिप्पणी नसून आधुनिक भारतीय समाजाला अंतर्मुख करणारा संदेश असल्याचे उपस्थितांनी सांगितले.


यावेळी बोलताना ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले की, देश स्वतंत्र झाला असला तरी अनेकांच्या मनामध्ये अजूनही मानसिक गुलामगिरीची साखळी कायम आहे. सामाजिक परिवर्तनासाठी केवळ राजकीय स्वातंत्र्य पुरेसे नसून वैचारिक आणि मानसिक स्वातंत्र्य आवश्‍यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “सबकॉन्शिओ शासनाच्या हजारो वर्षांच्या साखळ्या तोडण्याची वेळ आली असून, ‘रिकॉन्शिओ क्रांती’ची गरज आहे,” असेही त्यांनी सांगितले.


ते पुढे म्हणाले की, उभारण्यात आलेली “ज्ञानगुढी” ही डीजे संस्कृती, ध्वनीप्रदूषण आणि दिखाऊ शक्तिप्रदर्शनाविरोधातील वैचारिक प्रतीक आहे. ही गुढी विवेक, संविधानिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बौद्धिक क्रांतीचा संदेश देणारी असेल. बाबासाहेबांनी देशाला संविधान, शिक्षण, स्वाभिमान आणि विचारस्वातंत्र्य दिले. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हा त्यांचा मूलमंत्र होता. त्यांनी कधीही गोंधळ, ध्वनीप्रदूषण किंवा दिखाऊपणाचा पुरस्कार केला नाही, असेही त्यांनी नमूद केले.


अशोक सब्बन यांनी न्यायालयाने उपस्थित केलेला प्रश्‍न अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. “जर एखादा विद्यार्थी अभ्यास करू शकत नसेल, रुग्ण झोपू शकत नसेल, वृद्ध नागरिक त्रस्त होत असतील, तर हा कोणता सामाजिक न्याय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. “ज्ञानगुढी” ही वाचनालये, अभ्यासिका, संविधान वाचन, विज्ञाननिष्ठ चर्चा, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि जातीय मानसिकतेविरुद्ध वैचारिक लढा यासाठी प्रेरणा देणारी चळवळ ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


प्रकाश थोरात म्हणाले की, “मोठा आवाज म्हणजे मोठा विचार नसतो; डीजे काही तास घुमतो, पण ज्ञान पिढ्यान्पिढ्या घुमत राहते.” हा उपक्रम समाजामध्ये वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या विचारांचा खरा सन्मान करायचा असेल, तर समाजाने शिक्षण, वाचन, विज्ञान आणि संविधानिक मूल्यांचा स्वीकार करणे गरजेचे आहे. समाजाला खऱ्या अर्थाने बदलायचे असेल, तर आवाजाची नाही तर विचारांची क्रांती घडवावी लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


उपस्थित कार्यकर्त्यांनी भविष्यात जिल्हाभर “ज्ञानगुढी” अभियान राबवून युवकांमध्ये संविधानिक जागर, बौद्धिक चर्चा, अभ्यासिका निर्मिती, सामाजिक जबाबदारी आणि विवेकवादी विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *