कोरोना काळापासून सुरू असलेल्या निस्वार्थ सेवाकार्याचे कौतुक
संकटातील प्रत्येक गरजवंताच्या मदतीला धावणाऱ्या लंगर सेवेची सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी -विखे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर-घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयाला पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट देत संस्थेच्या कार्याची पाहणी केली. कोरोना महामारीपासून सुरू असलेल्या या सेवाकार्याचा आढावा घेत त्यांनी संस्थेच्या निस्वार्थ सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, नगरसेवक मोहित पंजाबी, जीतू गंभीर, जय भोसले, लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, राजेंद्र कंत्रोड, मुन्नाशेठ जग्गी, राजू जग्गी, सतीश गंभीर, प्रशांत मुनोत, सुनील थोरात, राजा नारंग, गुलशन कंत्रोड आदी मान्यवर उपस्थित होते.
तारकपूर येथील अन्न छत्रालयात दररोज गरजू, निराधार, कामगार, रुग्णांच्या नातेवाईकांसह अनेक गरजूंना मोफत भोजन उपलब्ध करून दिले जाते. कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असताना घर-घर लंगर सेवेने हजारो नागरिकांपर्यंत अन्न पोहोचवून मानवतेचे दर्शन घडविले होते. आजही ही सेवा त्याच समर्पणाने सुरू असल्याने सामाजिक क्षेत्रात या उपक्रमाची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, घर-घर लंगर सेवेने कोरोना काळात भुकेल्यांच्या सेवेसाठी अपार परिश्रम घेतले. अनेक स्वयंसेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून गरजूंना अन्न पोहोचविले. संकटकाळात समाजाच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी मानवसेवा असून, श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानने हे कार्य सातत्याने जपले आहे. ही सेवा आजही तितक्याच ताकदीने सुरू असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे कार्य संस्था करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून घर-घर लंगर सेवा सातत्याने भुकेल्यांना अन्न, गरजू कुटुंबांना आधार आणि संकटग्रस्तांना मदत देत कार्यरत राहिली आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीतही संस्थेने पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला. सामाजिक बांधिलकी जपत निरपेक्ष भावनेतून कार्य करणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांना दिलासा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत जनक आहुजा यांनी केले. त्यांनी घर-घर लंगर सेवेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. अन्न छत्रालयामार्फत दररोज शेकडो गरजूंना मोफत भोजन उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सामाजिक सलोखा, मानवसेवा आणि परस्पर सहकार्य या मूल्यांच्या आधारे संस्था विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अन्न छत्रालयाची पाहणी करून स्वयंसेवकांशी संवाद साधला. अनेक गरजू नागरिकांसाठी सुरू असलेली ही सेवा समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
