• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

रामवाडीत बालगोपाळांसह भिमजयंती साजरी

ByMirror

Apr 17, 2026
कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा उपक्रम

कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा उपक्रम


बाबासाहेबांची जयंती त्यांच्या महान विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी -विकास उडाणशिवे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथे कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण, परंतु साधेपणात साजरी करण्यात आली. समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत साजऱ्या करण्यात आलेल्या या जयंतीने लक्ष वेधले.


कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी उपस्थित नागरिकांनी “जय भीम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. जयंतीनिमित्त लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले, तसेच त्यांच्यात बाबासाहेबांच्या विचारांची बीजे रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.


कार्यक्रमात बाबासाहेबांच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या समानता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांवर आधारित विचारांचे महत्त्व पटवून देण्यात आले. विशेष म्हणजे, डीजे आणि अनावश्‍यक खर्चाला फाटा देत, साध्या आणि विधायक पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिक, महिला, युवक तसेच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विकास उडाणशिवे म्हणाले की, जयंती फक्त नाचण्यासाठी नाही, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आहे. बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले संविधान, शिक्षणाचा अधिकार आणि समानतेचा मार्ग हा प्रत्येकाने आचरणात आणणे गरजेचे आहे. या कार्यक्रमात अनावश्‍यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबवले. कारण बाबासाहेबांनी नेहमीच शिक्षण, संघटन आणि संघर्ष यांचा संदेश दिला. त्याच विचारांनुसार आपण मुलांना खाऊ वाटप केले, त्यांना त्यांच्या विचारांची ओळख करून दिली हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *