• Sat. Aug 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादनासह वृक्षारोपण

ByMirror

Aug 1, 2026
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादनासह वृक्षारोपण

पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश; अण्णाभाऊंच्या विचारांसोबत कलमी आंब्याच्या वृक्षांची लागवड


झाडे लावणे म्हणजे पुढील पिढ्यांसाठी समृद्ध भविष्याची पायाभरणी होय -डॉ. सुनील सकट


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सिद्धार्थनगर येथे त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘रेसिडेन्शियल हायस्कूल’च्या आवारात कलमी आंब्याचे वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
हा उपक्रम महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनील सकट यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत साळवे तसेच शाळेतील विद्यार्थिनी यांच्या हस्ते कलमी आंब्याच्या रोपाची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते विनोद घोरपडे, स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. तर उपस्थितांनी केंद्र शासनाकडे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या असामान्य साहित्य, समाजजागृती आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान तातडीने जाहीर करण्याची मागणी केली.


डॉ. सुनील सकट म्हणाले की, “लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे योद्धे होते. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाला आवाज दिला. त्यांच्या साहित्याने समाजात स्वाभिमान, समता आणि न्यायाची जाणीव निर्माण केली. त्यांच्या विचारांचा वारसा कृतीत उतरला पाहिजे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. झाडे लावणे म्हणजे केवळ निसर्गाचे रक्षण नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी समृद्ध भविष्याची पायाभरणी असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *